
मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल जी भाषा वापरली ती अत्यंत निषेधार्ह -प्रवक्ते सचिन सावंत
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका करताना काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला होता.जरांगे पाटील यांनी थेट राहुल गांधीवर टीका केल्याने काँग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल जी भाषा वापरली ती अत्यंत निषेधार्ह आहे. मराठा समाजाचे नेतृत्व करत असताना, ही भाषा सुसंस्कृत आणि समंजस असलेल्या मराठा समाजाला शोभणारी नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांच्या यांच्या भाषेमुळे मराठा समाजाची अप्रतिष्ठा होत आहे. मराठा समाजाची ही भाषा नव्हे. त्यामुळे आरक्षणाचा लढा हा मनोज जरांगे यांनी खालच्या पातळीवर आणू नये, असे खडेबोल काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी सुनावले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधी व काँग्रेस पक्षावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सचिन सावंत म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल खालच्या दर्जाची भाषा वापरली असली तरी राहुल गांधी यांनीच जातीय जनगणनेसाठी रान पेटवले आहे आणि काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवली जाईल असेही ठणकावून सांगितले आहे. कोणत्याही जातीय संघर्षाशिवाय व कोणालाही न दुखावता मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग, हा याच ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याच्या राहुल गांधी यांच्या निर्धारातून सुकर होईल. काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासून कोणावरही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.




