
शुभमन गिल कर्णधार, तर रोहित-विराटचं कमबॅक! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
भारतीय संघ या महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे, ज्यासाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे बऱ्याच काळानंतर पहिल्यांदाच खेळताना दिसणार आहे, पण शुभमन गिल कर्णधार असणार आहे.भारताचा वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर आता ऑस्ट्रेलिया दौरा निश्चित झाला आहे. हा दौरा 19 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबरदरम्यान पार पडणार असून यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामने खेळले जातील. बीसीसीआयने या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे.मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन संघाची घोषणा केली. यावेळी वनडे संघासाठी नवीन कर्णधाराचीही घोषणा करण्यात आली. आता शुभमन गिल कसोटीसोबतच वनडे संघाचे नेतृत्व करणार आहे. म्हणजेच रोहित शर्मा फक्त फलंदाज म्हणून संघात सामील होणार आहेत. विशेष म्हणजे, डिसेंबर 2021 नंतर रोहित पहिल्यांदाच खेळाडू म्हणून संघात निवडला गेला आहे. रोहित शर्मा सोबतच विराट कोहलीचीही वनडे संघात पुनरागमन झाले आहे. या दोघांनी शेवटचा सामना भारतासाठी 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला होता. म्हणजे जवळपास 7 महिन्यांनंतर हे दोघे पुन्हा मैदानात दिसणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारत पहिल्यांदा वनडे मालिका खेळणार आहे. तसेच, डिसेंबर 2020 नंतर भारत पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात वनडे सामने खेळणार आहे.




