
लांजा तालुक्यातील आंजणारीत साडेपाच लाखांची घरफोडी
लांजा तालुक्यातील आंजणारी शिखरेवाडी येथे तब्बल ५ लाख ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या चोरीची तक्रार बुधवार दि. १ ऑक्टोबर रोजी लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
शुभांगी यशवंत शिखरे (वय ४५, रा. आंजणारी, शिखरेवाडी, ता. लांजा) यांच्या घरात ही चोरी झाली. घरातील कपाटाच्या लॉकरमधून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने लांबवले आहेत. ही घटना १२ मे ते २० सप्टेंबर या कालावधीत घडली आहे. शिखरे यांच्या तक्रारीनुसार चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये २५ ग्रॅम ९६० मिलि वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत २ लाख ५० हजार), १५ ग्रॅम ५२० मिली वजनाचा हार (किंमत १ लाख ५० हजार), ६ ग्रॅम वजनाची कर्णफुले (किंमत १० हजार), ३ ग्रॅम ८८० मिली वजनाच्या कानसाखळ्या, २ ग्रॅम ५०० मिलि वजनाची अंगठी (किंमत २५ हजार), ३ ग्रॅम १०० मिलि वजनाची अंगठी (किंमत ३० हजार), असा एकूण ५ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने कपाटाच्या लॉकरमधून चोरून नेला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे करत आहेत.www.konkantoday.com




