
मुंबई गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील ओणी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
मुंबई गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील ओणी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करुन अधिक तपास करण्यात येत आहे. याबाबतची माहिती राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यानी राजापूर वनविभागाला दिली असल्याची माहिती राजापूर वनविभागाने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
राजापूर वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, ओणी, राजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ या रस्त्यावर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. याविषयीची माहिती पोलीस निरीक्षक राजापूर अमित यादव यांनी दूरध्वनी वरून वनविभागाला दिली. राजापूर वनविभागाने तात्काळ परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना या घटनेची माहिती देऊन पथकासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता महामार्गाच्या उजव्या बाजूला वन्यप्राणी नर जातीचा बिबट्या निपचित पडलेला दिसून आला.




