
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने हेलिकॉप्टर विकत घेतलं, सांगलीत सासऱ्याला दाखवायला गेल्यावर जावयाचं केलं स्वागत
आटपाडीचे जावई शिवाजी पवार यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन हेलिकॉप्टरची खरेदी केली. त्याच्या पूजनासाठी ते थेट सासरवाडीत हेलिकॉप्टर घेऊन आले. जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या हस्ते त्याचे पूजन करण्यात आले. आटपाडीच्या जावयाच्या या कर्तृत्वाची चर्चा रंगली आहे.
आटपाडीच्या कन्या शशिकला नांगरे यांचा कोल्हापूर येथील ठेकेदार शिवाजी पवार यांच्याशी पंचवीस वर्षांपूर्वी विवाह झाला. आटपाडीतील रवींद्र चव्हाण यांच्या त्या मोठ्या बहीण आहेत. शिवाजी पवार हे शासकीय कामे घेतात. तसेच त्यांचे इतरही उद्योग आणि व्यवसाय आहेत. या व्यवसायासाठी त्यांनी अनेक चार आणि सहा चाकी गाड्या खरेदी केल्या आहेत, मात्र त्यांचे हेलिकॉप्टर खरेदीचे स्वप्न होते. ते यंदाच्या दसऱ्याला त्यांनी पूर्ण केले. दोन दिवसांपूर्वी त्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन हेलिकॉप्टर विकत घेतले.
श्री. पवार जावयांचा आटपाडीशी चांगला जिव्हाळा असून, येथेही त्यांनी अनेक मित्रमंडळी जोडलेली आहेत. त्यामध्ये जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळेच आटपाडीत खरेदी केलेले नवीन हेलिकॉप्टर घेऊन पूजनासाठी आले होते. श्री. पाटील यांच्या कला व विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर ते उतरले.
यावेळी तानाजीराव पाटील यांच्या हस्ते हेलिकॉप्टरचे पूजन करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी शिवाजी आणि शशिकला पवार यांच्यासह त्यांच्या सासरवाडीतील नातेवाईक मेहुणा रवी नांगरे, दत्तात्रय पाटील, रामदास सूर्यवंशी, अरविंद चव्हाण, ब्रह्मदेव होनमाने, दत्तात्रय पाटील, मुन्ना तांबोळी आदी उपस्थित होते




