
स्वच्छता अभियान राबविल्याने साटवली गढीने घेतला मोकळा श्वास
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लांजा तालुक्यातील साटवली गढीच्या ठिकाणी शिवगंध प्रतिष्ठान लांजा, लांजा महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी आणि साटवली ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामुळे या गढीने पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतला आहे.
छत्रपती शिवरायांच्या काळात जलमार्गे मालाची ने-आण करण्याच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावणारे व त्या काळात तालुक्यातील प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून उदयास आलेले तालुक्यातील साटवली येथील ऐतिहासिक बंदर आणि गढीकडे पुरातत्व विभागाचे तसेच स्थानिकांचे दुर्लक्ष झाल्याने सद्यस्थितीत ही गढी अखेरची घटका मोजत आहे, लांजा तालुक्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या गढीचे संवर्धन व्हावे व पुढील पिढीला तालुक्याचा समृद्ध वारसा ज्ञात व्हावा या दृष्टीने शिवगंध प्रतिष्ठान लांजा, साटवली गावातील स्थानिक ग्रामस्थ आणि लांजा महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने साटवली किल्ला संवर्धनाच्या दृष्टीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला स्थानिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला. पाऊस असताना देखील साटवली गढीची साफसफाई करण्यात आली. या मोहिमेंतर्गत अंतर्गत भागात वाढलेली झाडे झुडपे, काटेरी झुडपे तोडण्यात आली.
www.konkantoday.com




