
रत्नागिरी शहरातील रस्ते दिवाळीपूर्वी खड्डेमुक्त करावेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन

रत्नागिरी : शहरातील सर्व रस्ते दिवाळीपूर्वी तात्काळ दुरुस्ती करून शहर खड्डेमुक्त करावेत, या मागणीसाठी ३ ऑक्टोबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आणि रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
रत्नागिरी शहरातील सर्व रस्ते अत्यंत नादुरुस्त झालेले आहेत. कोकणात गणेशोत्सवाला, नवरात्रौत्सवाला चाकरमनी, पर्यटक मोठ्या संख्येने आले होते; परंतु ठेकेदारांच्या निकृष्ठ दर्जाच्या कामांमुळे रस्त्यांची झालेली दुर्दशा यामुळे रस्त्यांनी गाडी चालवणे मुश्किल झालेले आहे. ठिकठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढून प्रवासी जखमी होत आहेत. याकडे प्रशासनाला लक्ष द्यायला वेळ नाही. तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री विदेश दौरे व विमानाने प्रवास करत असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली अत्यंत बिकट परिस्थिती पहायला व फोटोग्राफी करायला त्यांच्याकडे वेळ नाही आहे.
या प्रश्नांसदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्व नागरिकांना, वाहन चालकांना, प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे की शनिवारी (४ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजता नादुरुस्त झालेल्या रस्त्यांच्या ठिकाणी एक इशारा म्हणून रास्ता रोको करावा. या पार्श्वभूमीवर आपणास निवेदन देवून सुचित करण्यात येत आहे.”
“काही दिवसांवर दिवाळी सण जवळ आला आहे. तत्पूर्वी रत्नागिरी शहरातील सर्व रस्ते तात्काळ दुरुस्ती करून खड्डेमुक्त करण्यात यावेत. अन्यथा दिवाळी सणातून/दिवाळीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी”, असे या निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार बाळ माने, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, शहर संघटक प्रसाद सावंत यांच्यासह इतर पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.




