“डोनाल्ड ट्रम्प यांना तो अधिकारच नाही”, H-1B Visa शुल्कवाढीविरोधात अमेरिकन न्यायालयात खटला दाखल!

: कुशल परदेशी कर्मचाऱ्यांना अमेरिकेत काम करण्याची परवानगी देणाऱ्या एच-१बी व्हिसासाठी १ लाख डॉलर्स शुल्क आकारण्याच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाविरोधात विविध संघटना, उच्च शिक्षण व्यावसायिक आणि एक कर्मचारी एजन्सीने खटला दाखल केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या एच-१बी व्हिसा योजनेला आव्हान देणारा हा पहिला मोठा खटला शुक्रवारी सॅन फ्रान्सिस्को येथील फेडरल कोर्टात दाखल करण्यात आला. न्यू यॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, खटला दाखल करणाऱ्यांमध्ये जस्टिस अॅक्शन सेंटर, डेमोक्रसी फॉरवर्ड फाउंडेशन आणि साउथ एशियन अमेरिकन जस्टिस कोलॅबोरेटिव्ह यांचा समावेश आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिसा शुल्क वाढीचा निर्णय

डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात नवीन एच-१बी व्हिसा अर्जासाठीचे शुल्क १ लाख डॉलर्सपर्यंत वाढवण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली होती. व्हाईट हाऊसने व्हिसा कार्यक्रमाचा दुरुपयोग होत असल्याचा युक्तिवाद करत म्हटले होते की, यामुळे अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येत आहे, तसेच नवीन शुल्कामुळे कंपन्यांना परदेशी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्याऐवजी अमेरिकन कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देण्यास भाग पडेल.

खटल्यात काय म्हटले आहे?

डोनाल्ड ट्रम्प यांचा एच-१बी व्हिसावर १ लाख डॉलर्स शुल्क आकारण्याचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा या खटल्यात करण्यात आला आहे. याबाबत ब्लूमबर्गने वृत्त दिले आहे. त्यात असा युक्तिवाद करण्यात आला की व्हिसा कार्यक्रमातील बदल बेकायदेशीर आहे, कारण राष्ट्राध्यक्षांना एकतर्फी निर्णय लादण्याचा अधिकार नाही कारण तो अधिकार अमेरिकन काँग्रेसकडे आहे.

“सर्वात महत्त्वाचे, राष्ट्राध्यक्षांना युनायटेड स्टेट्ससाठी महसूल निर्माण करण्यासाठी एकतर्फी शुल्क, कर किंवा इतर यंत्रणा लादण्याचा किंवा त्या निधीचा वापर कसा करायचा हे ठरवण्याचा अधिकार नाही”, असे खटल्यात म्हटले आहे.

एच-१बी व्हिसाचे सर्वात मोठे लाभार्थी भारतीय

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम भारतीय नागरिकांना होणार आहे, जे अमेरिकेच्या एच-१बी व्हिसाचे सर्वात मोठे लाभार्थी आहेत. सध्या या व्हिसाधारकांपैकी सुमारे ७० टक्के लोक भारतीय नागरिक आहेत. सध्या अमेरिकेत एच-१बी व्हिसावर सुमारे ३ लाख उच्च-कुशल भारतीय कर्मचारी काम करत आहेत.

हेही वाचाDonald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा गाझा युद्धाच्या पार्श्वभूमीवर हमासला अल्टिमेटम; म्हणाले, ‘रविवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत…’

अमेरिका दरवर्षी लॉटरी पद्धतीने ८५ हजार एच-१बी व्हिसा देते. गेल्या काही वर्षांमध्ये या ८५ हजार व्हिसांपैक ७० टक्के व्हिसा भारतीयांना मिळाले आहेत. यापूर्वी, बहुतेक एच-१बी व्हिसा अर्जांसाठी २१५ डॉलर्स शुल्क आणि अतिरिक्त ७५० डॉलर्स आकारले जात होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्कवाढीच्या निर्णयानंतर, यासाठी सध्याच्या शुल्काव्यतिरिक्त १ लाख डॉलर्सची अतिरिक्त रक्कम भरावी लागणार आहे.

https://chat.whatsapp.com/JdTscwkK04n3RWNSijpnIq?mode=ems_copy_t

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button