
अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ धडकणार
मुंबई ०४ : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ धडकणार आहे. या हंगामातील हे पहिलं चक्रीवादळ असून ते शुक्रवारी तीव्र झालं आहे. शनिवारी ते अधिक तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. शक्ती चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
७ ऑक्टोबरपर्यंत सतर्कतेचा इशारा
भारतीय हवामान विभागाने (IMD) चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा दिला आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना अधिक सतर्क राहण्याचं सांगण्यात आलं आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवरील समुद्राची स्थिती अत्यंत धोकादायक राहील. समुद्रात चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. बोटींना बंदरातच थांबण्याचं सांगितलं असून जे समुद्रात आहेत त्यांना तात्काळ मागे परत येण्याचं सांगितलं आहे. तसंच किनारपट्टीवरील रहिवाशांना सावधानेचा इशारा दिला आहे.




