
अनुकंपा तत्त्वावरील आणि सरळ सेवा 137 जणांना नियुक्तीपत्रजनतेच्या कामाशी आपण बांधिल ही भूमिका ठेवून आदर्शवत काम करा – डॉ. उदय सामंत
रत्नागिरी, दि. 4 ) : आपण जनतेशी बांधील आहोत. काम घेऊन येणाऱ्या माणसाशी बांधलेले आहोत. एखाद्यावर अन्याय झाला असेल तर, त्याला न्याय देण्यासाठी आपली खुर्ची आहे. ही भूमिका ठेवून काम करावे. आपल्या प्रशासकीय कामाचा एक वेगळा ठसा राज्यभरात उमटवावा, अशी अपेक्षा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केली.


येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात अनुकंपा तत्त्वावरील 24, सरळसेवा 113 अशा एकूण 137 उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रक्रांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, ज्यांना खऱ्या अर्थाने नोकरीची आवश्यकता आहे, त्यांना नोकरी देण्याचा अशा पद्धतीने वेगवेगळी नियुक्ती देण्याचा कार्यक्रम राज्यभरात आयोजित केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मनापासून धन्यवाद देतो.


सगळ्या उमेदवारांच्यावतीने शासनालादेखील मनापासून धन्यवाद देतो. जिल्हाधिकारी कार्यालय असेल, जिल्हा पुरवठा कार्यालय असेल, जिल्हा परिषद असेल, पोलीस अधीक्षक कार्यालय असेल, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम, सिंचन मंडळ, सहकारी संस्था, विद्युत निरीक्षण विभाग, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालय, व्यवसाय प्रशिक्षण कार्यालय, जलसंधारण, महिला व बालविकास आणि कौशल्य विकास या सगळ्यांना देखील धन्यवाद देतो. आवश्यक असलेल्या उमेदवारांना नोकरी देण्याचं काम तुम्ही केलं. एक वेगळा आदर्श प्रशासनासमोर तुम्ही निर्माण करून दिला. त्याबद्दल जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुमचं मनापासून कौतुक करतो.


नोकरीत आल्यानंतर तुमची जबाबदारी वाढणार आहे. चांगले काम केल्यास पदोन्न्तीदेखील मिळणार आहे. आपण जनतेचे पाईक आहोत. कामासाठी येणाऱ्या व्यक्तीला नाराज करु नका. त्यांचे हसत-हसत काम करा. नियमांमध्ये जर काम असेल तर, कुठच्याही क्षणाचा विलंब न लावता ते आपण काम करून देऊ शकतो, ही भूमिका नवीन नियुक्त उमेदवारांनी घेतली पाहिजे. कामासाठी येणाऱ्या व्यक्तीचे हसतमुखाने स्वागत करेन आणि त्याला अपेक्षित असलेलं काम करण्यासाठी प्रयत्न करेन, ही जर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही शपथ घेतली, संकल्प केला तर, हे नियुक्तीपत्र आम्ही सगळ्यांनी मिळून तुम्हाला दिलं याचा कुठेतरी सार्थक होईल.

ज्यांना आम्ही नियुक्ती दिली ते महाराष्ट्रातले सगळ्यात चांगले आणि आदर्शवत असे उमेदवार आहेत, असं ऐकण्याचे भाग्य माझ्यासारख्या पालकमंत्र्याला मिळावे, अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी प्रास्ताविकात विविध विभागातील नियुक्तबाबत माहिती दिली.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 10 हजाराचा धनादेश
राज्यात आलेल्या पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी मदत म्हणून इरशाद बागवान यांनी 10 हजारांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला. हा धनादेश पालकमंत्री डॉ. सामंत यांच्याकडे श्री. बागवान यांनी सुपूर्त केला.
१३७ जणांना नियुक्तीपत्र


जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय – ५४, जिल्हा पुरवठा कार्यालय – १९, जिल्हा परिषद – १४, पोलीस अधीक्षक कार्यालय – ८, जिल्हा अधीक्षक कृषी आधिकारी – ७, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम – १०, अधीक्षक अभियंता सातारा सिंचन मंडळ – ५, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था -१, विद्युत निरीक्षण विभाग – २, राज्य उत्पादन – ३, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय – १, कार्यकारी अभियंता गुणनियंत्रण – १, रत्नागिरी पाटबंधारे – २, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र – १, जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग – १, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण कार्यालय – ३, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय – १, नगर परिषद रत्नागिरी – १, देवरुख नगर पंचायत – १, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय – २ अशा एकूण १३७ जणांना नियुक्ती देण्यात आली. पालकमंत्री यांच्या हस्ते प्रातनिधिक स्वरुपात संजय चव्हाण, विवेक वळवी, वैष्णवी ठाकरे, विनायक धस, संध्याराणी निकम, सुरेश जगदाळे, अभिजीत लांडगे, शीतल बेंडखळे, शालन धनगर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुर्वा पेठे यांनी केले. कार्यक्रमाला विविध विभाग प्रमुख, नवनियुक्त उमेदवार उपस्थित होते.
000




