लोटिस्मा’चे आदर्श वाचक आणि ग्रंथमित्र पुरस्कार प्रदान

चिपळूण :: येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आदर्श वाचक आणि ग्रंथमित्र पुरस्कार नुकतेच वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात आमदार शेखरजी निकम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर मिलिंद कापडी, वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, उपाध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, सहकार्यवाह विनायक ओक आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालिका स्वरदा कुलकर्णी यांनी केले. आमदार निकम यांचा सत्कार डॉ. जाधव यांच्या हस्ते तर मिलिंद कापडी यांचा सत्कार कार्याध्यक्ष अरुण इंगवले यांच्या हस्ते करण्यात आला.

वाचनालयाचे मो. गो. कानडे आदर्शवाचक पुरस्कार ज्येष्ठ वाचक श्रीकांत फडके, ज्येष्ठ महिला वाचक सुलोचना खातू, विणा सावंत यांना तर द. पां. साने ग्रंथ मित्र पुरस्काराने वैभव खेडेकर यांना आ. निकम यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, रोख रक्कम, शाल आणि ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात सुलोचना खातू यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी १९९६पासून आजपर्यंत वाचलेल्या पुस्तकांची नोंद ठेवली असल्याचे सांगितले. आपणास बालवयातच केसरी, मराठा ही वर्तमानपत्र छोटी पुस्तक वाचनाचे संस्कार कुटुंबात झाले. इथल्या वाचनालय मध्ये अतिशय आपुलकीने ग्रंथ देवघेव केली जाते. पुरस्कार प्राप्त वाचकमित्रांच्या वतीने त्यांनी वाचनालयाचे आभार मानले.

वाचनालयाच्या ग्रंथपाल गौरी भोसले यांची कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण येथे संचालिका म्हणून निवड झाल्याबद्दल शाल, पुस्तकं देऊन आ. निकम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. गौरी भोसले यांनी मनोगत व्यक्त करताना वाचनालयाच्या आदर्श वाचक निवडीचे निकष विशद केले.

याच कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, लेखक सुहास बारटक्के यांच्या “नीती मूल्यांच्या संस्कार कथा” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. वाचनालायनेही त्यांचा विशेष सन्मान केला.

आ. निकम यांनी पुरस्कार प्राप्त सर्वांचे अभिनंदन करून लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराबाबत आपल्या मनोगतात गौरवोद्गार काढले. वाचनालय राबवित असलेल्या विविध उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. ज्येष्ठ वाचकांचा सन्मान करण्याची संधी मिळाली हा मी माझा सन्मान समजतो, असे निकम यावेळी म्हणाले.

प्रा. डॉ. प्रतिक ओक यांनी पी.एच.डी. प्राप्त केल्याबद्दल त्यांचाही आ. निकम यांच्या हस्ते शाल, मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ओक यांचा परिचय संचालक अनिल धोंडे यांनी उपस्थित यांना करून दिला. सत्काराच्या निमित्ताने वाचनालयाच्या वतीने डॉ. प्रतीक ओक यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन संचालिका मानसी पटवर्धन यांनी केले.

पुरस्कार सोहळ्यानंतर डॉ. प्रतीक ओक यांनी तंत्रज्ञानातून केलेले संशोधन या विषयावर स्लाईड शो दाखवून अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले.

यावेळी वाचनालयाचे समन्वयक प्रकाश देशपांडे, कोषाध्यक्ष दीक्षित, संचालक श्रीराम दांडेकर, मधुसूदन केतकर, प्राची जोशी, पुरस्कार प्राप्त व्यक्तीचे कुटुंबीय, मित्रमंडळी वाचक, वाचनालयाचे कर्मचारी आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालिका मनीषा दामले तर आभार अनिल धोंडे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button