महाभारताची ओळख

काळाच्या ओघात ज्यांची महती टिकून राहील अशा फार थोड्या गोष्टी शिल्लक आहेत. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे भारतवर्षाच्या देदीप्यमान इतिहासातील महाभारत हे अतिशय देखणे महाकाव्य. रत्नागिरीतील कीर्तनसंध्या परिवारातर्फे २०२५ साली याच महाकाव्याचा पहिला भाग निरूपणासाठी घेतला होता. दरवर्षी इतिहासाच्या सुवर्णकाळाचे वर्णन आपल्या ओघवत्या वाणीने मांडणारे लोकप्रिय कीर्तनकार विद्यावाचस्पती हभप चारुदत्त गोविंदस्वामी आफळे यांनीच कीर्तनमालेच्या पहिल्या भागाचे निरूपण केले होते. यावर्षी त्याचा पुढचा भाग ६ जानेवारी ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत कीर्तनमालेतून मांडला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर चिपळूणचे प्रसिद्ध प्रवचनकार धनंजय चितळे यांनी महाभारताची थोडक्यात ओळख करून दिलेल्या लेखांची मालिका आजपासून.

०००००००००००००००
ओळख महाभारताची
भाग १
धनंजय चितळे
००००००००००००

भीम आणि मारुती
गेल्या वर्षी कीर्तनसंध्येच्या श्रोत्यांना महाभारताची ओळख व्हावी म्हणून १८ लेखांची एक मालिका तयार करण्याचे भाग्य मला लाभले. अनेक श्रोत्यांनी आयोजकांना तसेच मलाही फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून महाभारताबद्दल औत्सुक्य वाढवणारी लेखमाला आवडली, असे सांगितले .त्यामुळेच याही वर्षी असेच काही लेख घेऊन आपल्या सेवेमध्ये येत आहे . महाभारत हा ग्रंथ म्हणजे विविध कथा, उपकथानके तसेच विविध विषयांवर मार्गदर्शन करणारी बोधवचने यांचा अक्षरशः महासागर आहे. महाभारतात नाही ते या त्रिलोकात नाही. श्री ज्ञानेश्वर महाराजांची उक्ती यथार्थ आहे. गतवर्षी पाहिलेले विषय सोडून आणखी काही वेगळा भाग आता पाहू या.
पांडव वनवासात असताना त्यांची निर्णायक युद्धाची तयारी सुरू होती. आपल्याला कोणासमोर उभे राहायचे आहे, याची त्यांना पूर्ण कल्पना असल्यामुळे त्यांनी भगवान शंकरादि देवांकडून अस्त्रे प्राप्त करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. याच प्रयत्नात अर्जुन गेला असताना अन्य पांडव व द्रौपदी काम्यक वनात अर्जुनाची वाट पाहत बसले होते. खूप दिवस झाले, तरी अर्जुन आला नाही. त्याची खुशाली कळली नाही. म्हणून सर्वजण चिंतेत होते. त्याचवेळी महर्षी लोमश तेथे आले आणि अर्जुनाने भगवान श्री शंकरांकडून अस्त्र प्राप्त करून घेतले आहे आणि इंद्राच्या विनंतीवरून तो स्वर्गात अन्य काही अस्त्रे मिळवण्यासाठी गेला आहे, असे सांगितले. त्यानंतर निश्चिंत झालेले पांडव महर्षी लोमशांबरोबर तीर्थयात्रेला निघाले. अनेक तीर्थे पाहत पाहत ते बद्रिकाश्रमाजवळील नारायण ऋषींच्या आश्रमात अर्जुनाची वाट पाहत थांबले.
एके दिवशी अचानक मोठे वादळ झाले. त्या वादळात ईशान्य दिशेकडून एक अतिशय सुंदर, सुगंधित कमळ वाऱ्याने उडून पांडवांजवळ येऊन पडले. द्रौपदीला ते कमळ खूप आवडले . तिने भीमाजवळ अशी आणखी कमळे आणण्याचा हट्ट धरला. द्रौपदीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भीम त्या दिशेकडे जाऊ लागला. वाटेतील निबिड अशा आरण्यातून मार्ग काढताना भीमाला एक वृद्ध वानर रस्त्यामध्ये बसलेला दिसला. त्याची शेपटी वाटेमध्ये पसरलेली होती. त्या वानराने भीमाला सांगितले, “ही वाट देवलोकाकडे जाते. विशिष्ट पुण्य प्राप्त केल्याशिवाय या वाटेने जाता येत नाही. तेव्हा तू परत जा.” भीमाला आपल्या शक्तीवर जरा जास्तच विश्वास होता. त्याला वाटले, या वृद्ध कपीचे ऐकण्यापेक्षा आपण आपल्या बाहुबळाने संकटावर मात करू शकू, म्हणून आपण पुढे जावे हे योग्य. त्याने त्या वृद्ध कपीला आपली ओळख सांगितली. आपण केलेल्या पराक्रमांचे वर्णन केले आणि सांगितले, “तू मुकाट्याने माझी वाट सोड.” त्या वानराने भीमाचे म्हणणे ऐकले आणि तो म्हणाला, “माझी स्वतःची शेपटी बाजूला करण्याइतकी ही ताकद माझ्यात नाही तेव्हा तूच ती बाजूला कर आणि पुढे जा.” भीमाने खूप प्रयत्न करूनसुद्धा त्याला आपला मार्ग मोकळा करून घेता आला नाही. अखेर तो त्या वानराला शरण गेला आणि “आपण कोण आहात?” अशी विनम्रतेने विचारणा केली. शरणागतवत्सल श्रीमारुतीरायांनी आपले मूळ रूप भीमाला दाखवले आणि सांगितले, “भीमा, या मार्गाने जाणे हे मर्त्य मानवाला शक्य नाही. तेव्हा तू हे धाडस केलेस, तर तुझेच नुकसान होईल. म्हणून मी तुझ्या हितासाठी तुझा मार्ग अडवला. तुला जी कमळे हवी आहेत, ती मिळवण्यासाठी तू दुसऱ्या मार्गाने त्या सरोवराकडे जा. ते सरोवर यक्षांच्या ताब्यातील आहे. तेव्हा त्यांच्याशी सामना करून कमळे मिळव.” भीमाने महारुद्र मारुतीरायांना नमस्कार केला आणि तो पुढे गेला.
वाचकहो, भीमाचे गर्वहरण म्हणून ही गोष्ट आपल्याला माहीत आहे, पण भीम तिकडून का जात होता आणि मारुतीने रस्ता का अडवला, या गोष्टी आपल्याला ज्ञात नसतात. म्हणूनच ही गोष्ट सांगितली.
(क्रमशः)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button