‘नमन’ विषयक संशोधित ग्रंथाचे ना. सामंत यांच्याहस्ते आज (दि ४) प्रकाशन

लोकसंस्कृती आणि लोककलांच्या अभ्यासात फार मोठी भर पडणार

चिपळूण :: नमनात संकासूर पहिला का नाचतो? नटव्याचे मूळ स्वरूप काय? गणपती नमनात पहिल्या पासून होता का? रावण का आहे नमनात? गौळणीतील राधा स्त्री की पुरुष? नक्की काय आहे परंपरा? ‘नमन’ लोककला विषयक या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या, कोकणी लोककलांचे प्रसिद्ध अभ्यासक आणि साहित्यिक प्रा. संतोष गोनबरे यांनी लिहिलेल्या नमन – कोकणची समृद्ध लोकसंस्कृती या संशोधित ग्रंथाचे प्रकाशन आज (दि. ४) सकाळी १०.३० वाजता मराठी राज्य भाषा आणि उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते होत आहे. नमन लोककला रत्नागिरी जिल्हा, मातृसंस्था आयोजित हा कार्यक्रम हातखंबा (रत्नागिरी) येथील सिद्धगिरी मंगल कार्यालयात संपन्न होईल.

या प्रकाशन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इतिहासाचे व्यासंगी अभ्यासक प्रकाश देशपांडे, अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह, ग्रंथाच्या प्रकाशिका. संस्कृती प्रकाशनच्या सुनीताराजे पवार, भाषा अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक अरुण इंगवले, लोककला अभ्यासक आणि लेखिका डॉ. निधी पटवर्धन, लोककला अभ्यासक आणि पत्रकार अमोल पालये, प्रसिद्ध लोककलावंत सुनील बेंडखळे यांच्यासह ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकार सचिन काळे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखक आणि पर्यावरण-पर्यटन क्षेत्रातील कार्यकर्ते धीरज वाटेकर करणार आहेत. साठ-सत्तर वर्षांपूर्वीपर्यंत स्थितीशील असणारी ग्रामसंस्कृती जागतिकीकरणाच्या आणि माहिती तंत्रज्ञानाच्या रेट्यात वेगाने बदलत गेली. नागर जीवनाचे आकर्षण, विज्ञानाने दिलेल्या सुखोपभोगांचा स्वीकार, शिक्षणाचा प्रसार, संपर्क साधनांची सहजता या कारणांनी अनेक लोककला, लोकविधी, लोकसंस्कृती मोडून पडल्या किंवा आधुनिक वेशभूषेत समोर येऊ लागल्या. या बदलांच्या रेट्यातही काही गोष्टी अंशरूपाने आपला गाभा जपत राहिल्या. ‘नमन’ या रत्नागिरी जिल्हा आणि आसपासच्या परिसरातील महत्त्वाच्या विधीनाट्याचा गाभ्यासह साद्यंत आढावा या ग्रंथात घेण्यात आला आहे. ‘प्राकृत पद्याचा आरंभ असणाऱ्या ‘गाथा सप्तशती’ सह नमनातील मुखवट्यांसारखीच सोंगे आणि मुखवटे सापडलेल्या सिंधू संस्कृतीपर्यंत संदर्भ शोधून ते जोडण्याचे कार्य या ग्रंथात झाले आहे. या सोबतच अनेक पौराणिक ग्रंथ आणि संतसाहित्याचा धांडोळा घेऊन नमनाचे प्राचीनत्व उजागर करण्याचे काम या ग्रंथात झाले आहे.’ अशी नोंद भाषा अभ्यासक अरुण इंगवले यांनी पुस्तकाच्या ब्लर्बवर केली आहे.

नमन आणि तत्सम अनेक लोककला व विधीनाट्यांचा तौलनिक आढावा घेऊन त्यांच्यामधून अधोरेखित होणारे अनुभवजन्य शहाणपण या ग्रंथातून वाचकांसमोर येत आहे. लोकसंस्कृती आणि लोककलांच्या अभ्यासात फार मोठी भर घालणाऱ्या या ग्रंथाच्या प्रकाशन सोहोळ्यास उपस्थित राहाण्याचे आवाहन नमन लोककला रत्नागिरी जिल्हा, मातृसंस्थाचे अध्यक्ष पी. टी. कांबळे, उपाध्यक्ष मोहन घडशी, युयुत्सु आतें, सचिव परशुराम मासये, सहसचिव संतोष कुळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button