
ठाकरे गटात आलेल्या सिंधुदुर्गातील नेते राजन तेली यांचा आता शिदेंच्या शिवसेनेत प्रवेश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात मोठी चाल खेळलीये. ठाकरेंचा कोकणातील आणखी नेता एकनाथ शिंदेंनी गळाला लावलाय. काही महिन्यापूर्वीच ठाकरे गटात आलेल्या राजन तेली आता शिदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.राजन तेली कधीकाळी कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जात होते. मात्र, नंतरच्या काळात ते भाजपमध्ये गेले. नंतर ते ठाकरेंच्या शिवसेनेत आले होते. मात्र, आता त्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. राजन तेली राणे कुटुंबियांचे कट्टर शत्रू मानले जातात. मात्र, आता निलेश राणे आणि राजन तेली एकाच पक्षात असणार आहेत. त्यामुळे कोकणातील राजकीय गणितं बदलण्याची शक्यता आहे.दरम्यान, ठाकरेंची साथ सोडण्याच्या कारण काय? याबाबत राजन तेली यांनी भाष्य केलंय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत काम करण्याची संधी मिळत नव्हती. शिवाय, संघटन बांधणीसाठी मी जबाबदारी सोपवण्याची मागणी केली. मात्र, माझ्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं राजन तेली म्हणाले आहेत.




