मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या अपघातानंतर अधिकाऱ्याला धमकावले; माजी आमदार वैभव नाईकांविरुद्ध गुन्हा दाखल!

सावंतवाडी : मुंबई – गोवा महामार्गावरील झाराप – तिठा येथे मंगळवारी झालेल्या दुचाकी आणि कारच्या अपघातानंतर मोठा तणाव निर्माण झाला होता. संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला असताना, घटनास्थळी आलेल्या महामार्ग प्राधिकरणाच्या कनिष्ठ अभियंत्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, सावंतवाडी येथील कनिष्ठ अभियंता मुकेश राकेश साळुंके (वय ३३, सध्या रा. पिंगुळी आनंदवन, मूळ रा. धुळे) यांनी यासंदर्भात पोलिसांत फिर्याद दिली आहे.

मंगळवारी दुपारी झाराप – तिठा येथे झालेल्या या भीषण अपघातात दुचाकीवर असलेला लवू उर्फ राज पेडणेकर (वय १५, रा. साळगाव – नाईकवाडी) या शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांच्या जमावाने महामार्ग रोखून धरला. त्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी घटनास्थळी येत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत तेथील ‘मिडलकट’ तात्काळ बंद करण्याची मागणी केली.

महामार्गाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता (सावंतवाडी) वृषाली पाटील यांच्यासमवेत कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंके हे घटनास्थळी आले होते. याचवेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी साळुंके याना मिडलकट रस्ता बाबत विचारले आणि मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार साळुंके यांनी पोलिसांत केली आहे. त्यानुसार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातील महामार्गाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button