
२०१६ पासून बेपत्ता इसमाचा लावला शोध.
रत्नागिरी पोलिसांचे "मिशन शोध"
रत्नागिरी : बेपत्ता झालेल्या इसमांचा शोध घेण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी सुरू केलेल्या “मिशन शोध”ला आणखी एक यश मिळाले असून, सन २०१६ मध्ये शहरातून बेपत्ता असलेल्या इसमाचा शोध रत्नागिरी पोलिसांना लावला आहे. योगेश पुंडलिक खामकर (वय ३७) असे त्याचे नाव आहे.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीमधून हरवलेले व बेपत्ता झालेल्या इसमांचा शोध घेण्यासाठी “मिशन शोध” सुरू करण्यात आले आहे. या मिशनच्या अनुषंगाने सर्व पोलीस ठाण्यामार्फत जिल्ह्यातील हरविलेल्या व बेपत्ता इसमांचा विशेष शोध घेण्यात येत आहे.
५ एप्रिल २०१६ रोजी १०.३० वाजता रत्नागिरी शहरातील “कंदिल लॉज” मधील रूम नं. २०८ मध्ये आलेले ग्राहक योगेश खामकर हे रुमला लॉक करून परत येतो असे सांगून निघून गेले ते परत आले नाहीत, म्हणून कंदिल लॉजचे मालक यांनी आजुबाजूच्या परिसरात शोध घेतला; परंतु नापत्ता इसम मिळून आला नाही. याबाबत त्यांनी योगेश खामकर बेपत्ता असल्याची तक्रार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिली होती.
तात्कालिक तपासिक अंमलदार पोलीस हवालदार प्रवीण वीर नापत्ता श्री. खामकर यांची माहिती प्रसिद्ध होण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मिसिंग पर्सन ब्युरो, गुन्हे शाखा, गुन्हे अन्वेषण विभाग, भायखळा, मुंबई- २७, यांना सन २०२३ मध्ये पत्रव्यवहार केला होता व तपासिक अंमलदार पोलीस हवालदार प्रमोद कांबळे यांनी नापत्ता श्री. खामकर यांच्या दिलेल्या पत्त्यावर एसबीएस नगर, कांदपाडा, दहीसर, पूर्व, मुंबई येथे चौकशी केली असता नापत्ता हा येथील पत्यावर जावून-येवून असल्याचे निष्पन्न झाले. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे श्री. खामकर हा सखाराम गोरे यांच्या संपर्कात असल्याचेही निष्पन्न झाले.
सखाराम गोरे यांच्याकडे अधिक तपास केला असता श्री. खामकर हे लोटे (ता. खेड) एमआयडीसी येथील एका हॉटेलमध्ये कामाला असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे तपासिक अंमलदार पोलीस हवालदार प्रमोद कांबळे यांनी १९ सप्टेंबर २०२५ रोजी संबंधित हॉटेलच्या पत्त्यावर जाऊन खात्री केली असता श्री. खामकर हे सुमारे १ वर्षापासून सखाराम गोरे यांच्या हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून नोकरीला व त्यांच्याकडेच भाड्याने राहत असल्याचे निष्पन्न झाले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील तसेच पोलीस हवालदार प्रमोद कांबळे यांनी पार पाडली.




