
दुर्गम भागात कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्नमाचाळ येथे विधी साक्षरता शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी, दि. १ ) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश विनोद जाधव यांच्या आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्यातर्फे मौजे माचाळ (ता. लांजा) या दुर्गम भागात कायदेविषयक जनजागृती व विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी ग्रामस्थांना कुळ कायदा आणि महसूल विभागाच्या योजनांसह जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मोफत कायदेविषयक सेवांची माहिती देण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती व मार्गदर्शन
या शिबिरास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील, गटविकास अधिकारी लांजा एच. व्ही. गिरी, तहसिलदार लांजा प्रियांका ढोले, ज्येष्ठ विधिज्ञ संकेत तुकाराम ढवळ, श्री. झिमन, माचाळ मुचकुंडी पर्यटन विकास सेवा सहकारी संस्थेचे संस्थापक श्री. विवेक सांवत, सरपंच श्री. गाडे, विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी आणि बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना, ज्येष्ठ विधिज्ञ श्री. ढवळ यांनी ग्रामस्थांना कुळ कायद्यासंबंधी सविस्तर माहिती सांगितली, ज्यामुळे त्यांच्या जमिनीसंबंधीच्या अनेक शंका दूर झाल्या. तहसिलदार श्रीमती ढोले यांनी महसूल खात्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली, ज्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला घेता येईल. तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. पाटील यांनी प्राधिकरणाकडून राबविण्यात येणाऱ्या मोफत कायदेविषयक सल्ला व सहाय्य तसेच अन्य योजनांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या हक्कांविषयी आणि सरकारी योजनांविषयी माहिती मिळाल्याने हे शिबीर अत्यंत उपयुक्त ठरले.




