
क्रीडापटू व क्रीडाप्रेमी बाजीराव तावडे यांचे दुःखद निधन
मूळचे रत्नागिरीचे व
चिपळूण शहरातील क्रीडा क्षेत्राला मोलाची साथ देणारे, ९०च्या दशकातील राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या संयोजनात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी बाजीराव तावडे (वय ६५) यांचे रत्नागिरी येथे दुःखद निधन झाले.
रत्नागिरीवरून बदली होऊन चिपळूणमध्ये आल्यानंतर तावडे यांनी स्थानिक क्रीडा क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतला. चिपळूण तालुका कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. माजी आमदार बापूसाहेब खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्यस्तरीय सीझन बॉल क्रिकेट स्पर्धेत संयोजनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांनी पार पाडली. उत्तम यष्टीरक्षक म्हणून त्यांची क्रिकेटमधील ओळख होती. स्पर्धांचे नियोजन, संघांना आमंत्रण देणे, संघटनात्मक काम पाहणे यांत ते अग्रणी होते. सुचयअण्णा रेडीज यांच्याशी त्यांची घट्ट मैत्री होती. कॅरम, हॉलीबॉलसह इतर खेळाडूंनाही ते नेहमीच मदतीला धावून जात.
चिपळूण नगर पालिकेच्या स्विमिंग पूल उभारणीसाठी आराखडा तयार करताना देखील त्यांनी मार्गदर्शन केले होते. बाजीराव हे रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी होते त्यावेळी देखील त्यांनी क्रीडा क्षेत्रात मोठी भरीव कामगिरी केली होती त्यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्राला मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.




