
अजित पवार आणि शरद पवार यांची भेट! दोघांमध्ये तासभर चर्चा, पडद्यामागे काय घडलं?
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही बड्या नेत्यांची भेट झाल्याची मोठी बातमी समोर येत आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांच्यात तासभर चर्चा देखील झाल्याची माहिती आहे. मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटर येथे दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती आहे. दोन्ही नेते याआधी देखील विविध कारणास्तव भेटल्याचा इतिहास आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर दोन्ही नेते याआधीदेखील अनेकदा भेटले आहेत. पण राष्ट्रवादीचे दोन्ही गटात एकमेकांच्या विरोधात टोकाचा राजकीय वाद असल्यामुळे या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माळेगाव साखर कारखान्याबाबत चर्चा करण्यासाठी दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे. माळेगावच्या वार्षिक साधारण सभेची तारीख आणि वेळ ठरवण्यासाठी दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती आहे. अजित पवार यांनी स्वत: याबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार काय म्हणाले?
“शरद पवार हे माळेगावचं शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत. तिथल्या सभासदांनी मागेच त्यांना अध्यक्ष केलं आहे. तिथे जी बॉडी आहे, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन हा त्या बॉडीवर व्हाईस चेअरमन म्हणून येतो. अशी त्याची घटना आहे. त्यामुळे ते इलेक्शन झाल्यानंतर त्याबद्दलची जी बैठक होती त्यासाठी मी आलो होतो. ती बैठक झाली. विश्वस्त मंडळ नेमायचं असतं. तो अधिकार अध्यक्षांनाच असतो. आमचे सहा गट आहेत. त्यातील प्रत्येकी एक प्रतिनिधी घ्यायचा असतो”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर दिली.
“आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की, वार्षिक सर्वसाधारण सभा चाललेल्या आहेत. त्या सर्वसाधरण सभेची तारीख आणि वेळ ठरवायची होती. किती ॲडमिशन झाले याबाबत बैठक होती”, अशी माहिती अजित पवारांनी दिली. दरम्यान, या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये काही राजकीय चर्चा झाली का? याबाबतची माहिती समजू शकलेली नाही.




