राजापूर तालुक्यातून कार्तिकी एकादशीसाठी ५२ गाड्या सुटणार


राजापूर तालुक्यातून कार्तिकी एकादशी – निमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे वारकरी दिंड्या मार्गस्थ होऊ लागल्या आहेत. दरम्यान, पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार्‍या तालुक्यातील वारकर्‍यांनी एसटीच्या तब्बल ५२ गाड्यांचे आरक्षण केले आहे. या गाड्यांमधून व काही खासगी गाड्यांमधून विठू माऊलीच्या दर्शनासाठी येत्या दोन दिवसांमध्ये तीन हजारहून अधिक वारकरी पंढरपूर येथे जाणार आहेत.
दोन दिवसात टप्प्याटप्याने गाड्या पंढरपूरला होणार दाखल महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री विठ्ठल-रखुमाईच्या कार्तिकी एकादशी निमित्ताने दर्शनासाठी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरामध्ये भरणार्‍या वारकरी मेळाव्याला दरवर्षी तालुक्यातून मोठ्या संख्येने वारकरी जात असतात. त्याप्रमाणे यावर्षीही शीळ, उन्हाळे, कोदवली, ताम्हाणे, दोनिवडे, सौंदळ, ओझर, पडवे, तुळसवडे, आंगले, खरवते, पाचल, भालावली, गोवळ, वाटूळ आदी परिसरातील मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरला जात आहेत. त्यासाठी तालुक्यातील एसटी आगारातून ५२ गाड्यांचे आरक्षण केल्याची माहिती आगार प्रशासनाकडून देण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांमध्ये या गाड्यांमधून टप्प्याटप्प्याने वारकरी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे रवाना होणार आहेत. त्याबाबतचे नियोजनही वारकर्‍यांसह आगार प्रशासनाने केले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button