
रक्ताने माखलेली कार, कुजलेला मृतदेह; सिंधुदुर्गातील ‘त्या’ दोन गूढ घटनांमध्ये एकमेकांशी संबंधित?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत धारधार शस्त्राने खून करुन कुजलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह आढळून आला आहे. तर, दोडामार्गमध्ये तिलारी मुख्य वसाहतीजवळील पुलाखाली रक्ताने माखलेली संशयित कार आढळून आली आहे.
या दोन्ही घटनांमध्ये संबंध असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असून, पोलिसांनी यादिशेने तपास सुरु केला आहे.
खारेपाटणनजीक साळिस्ते येथे गुरुवारी दुपारी कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. श्रीनिवास रेड्डी (५३, बंगळुरु) असे या व्यक्तीचे नाव असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. याबाबत खातरजमा करण्यासाठी पोलिसांचे पथक कर्नाटकात रवाना करण्यात आले आहे. या व्यक्तीचा धारधार शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.दोन ते तीन दिवसांपूर्वी खून करुन व्यक्तीचा मृतदेह येथे फेकण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, याच दिवशी तिलारी येथे रक्ताने माखलेली आणि नोंदणी क्रमांक नसलेली कार आढळून आली आहे. तिलारी मुख्य वसाहतीजवळील पुलाखाली ही कार आढळून आली. तिलारी येथील कार आणि कणकवली येथील मृतदेहचा काही संबंध आहे का? याचाही तपास केला जात आहे.




