
कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी एक दिवसाचे सेवानिवृत्ती वेतन दिले पूरग्रस्तांना
रत्नागिरी : मराठवाड्यात पावसाने थैमान घातल्यानंतर आता सर्वत्र माणुसकीचे दर्शन घडत आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले असून, गुहागर पंचायत समितीचे माजी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनीही आपल्या सेवानिवृत्तीवेतनातून एका दिवसाचे सेवानिवृत्तीवेतन (पेन्शन) कपात करून ते पूरग्रस्तांसाठी दिले आहे.
मराठवाड्यातील उद्ध्वस्त शेतकऱ्यांसाठी ‘खारीचा वाटा’ म्हणून माझ्या ऑक्टोबर पेड नोव्हेंबर २०२५ च्या सेवानिवृत्तीवेतनातून एका दिवसाचे सेवानिवृत्तीवेतन (पेन्शन) कपात करून “मराठवाड्यातील पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात यावा, अशा आशयाचे पत्र गुहागर पंचायत समितीचे सेवानिवृत्त कृषी विस्तार अधिकारी तथा ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमनच्या (ऑफ्रोह’) संघटनेचे प्रसिध्दीप्रमुख गजेंद्र पौनीकर यांनी गुहागर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी (गट-अ) यांना दिले आहे.
या पत्रात श्री. पौनीकर यांनी म्हटले आहे की, “मी पंचायत समिती गुहागर कृषी विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होतो. नोव्हेंबर २०२४ मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्विकारली आहे. उन्हाच्या झळांनी होरपळणारा मराठवाडा आज ओल्या दुष्काळाने उद्ध्वस्त झालाय. हजारो माणसे, कुटुंब बेघर झाली आहेत. ५० लाख हेक्टरच्या वर शेतातील पिके नष्ट झालीत. जनावरे, गोठे, घरं, घरातील सामान, पुराच्या थैमानात वाहून गेले आहे. आभाळंच फाटलंय मराठवाड्यातील हजारो गावावर. जे व्हिडीओ समाज माध्यमांवर आले आहेत, ते पाहून मन गहिवरत आहे. संवेदनाच नाहीशा होतात की काय, असे वाटते; मात्र अशातही ‘माणुसकी जीवंत असल्याची’ उदाहरणे, आशेचा किरण घेवून येत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘ऑफ्रोह’च्या कोल्हापूर शाखेने यात ‘खारीचा वाटा’ उचलला.”
“मी ‘ऑफ्रोह’ कर्मचारी संघटनेमध्ये प्रसिद्धीप्रमुख म्हणून कार्यरत आहे ती संघटना मानवाच्या कल्याणासाठी लढणारी संघटना आहे.शासनाने गेले अनेक वर्ष सामाजिक अन्याय सुरू असताना आम्हाला ‘मानवतावादी दृष्टिकोनातून’ अधिसंख्य पदावर नेमणूक दिली. मराठवाड्यातील उद्ध्वस्त शेतकऱ्यांसाठी ‘खारीचा वाटा’ म्हणून माझ्या माहे ऑक्टोबर पेड नोव्हेंबर २०२५ च्या सेवानिवृत्तीवेतनातून एका दिवसाचे सेवानिवृत्तीवेतन (पेन्शन) कपात करून मराठवाड्यातील पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात यावा/पाठविण्यात यावा”, असे या पत्रात श्री पौनीकर यांनी म्हटले आहे.
याची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव मुख्य सचिव, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदींना पाठविण्यात आली आहे.




