
शंखेश्वर पार्क गृहनिर्माण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
रत्नागिरी : जिल्हा परिषदजवळील शंखेश्वर पार्क गृहनिर्माण सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा काल (२८ सप्टेंबर) अ . के. देसाई हायस्कूल येथे उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
मंगेश साळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत प्रारंभी संस्थेतील ज्ञात अज्ञात दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभेचे कामकाज सुरू करताना संस्थेचे सचिव रवींद्र कुळकर्णी यांनी इतिवृत्ताचे वचन केले. सभेत विविध विषयांवर चर्चा करून सभासदांच्या अडीअडचणींचे निरसन करण्यात आले. तसेच संस्थेच्या विकासाच्या दृष्टीने उपयोगी असलेले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मंगेश साळवी, सचिव रवींद्र कुळकर्णी यांच्यासह कोषाध्यक्ष रवींद्र कांबळे, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजय नलावडे, विनोद जाधव, सौ. नूतन दांडेकर, सौ. शिल्पा रानडे, सौ. सपना दाभाडे, सौ. संयोगिता सासणे, संस्थेच्या कर्मचारी सौ. रमा महाले आणि सभासद उपस्थित होते.
दरम्यान, सूर्या गॅस कंपनीचे प्रतिनिधी सूरज घडशी, यश मयेकर आणि साहिल पाटोळे यांनी घरगुती गॅस सिलेंडर वापरताना घ्यायची काळजी आणि सुरक्षा याविषयी उपस्थितांना प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. घरगुती सिलेंडर वापरताना संभाव्य धोके, दुर्घटना कशा पद्धतीने टाळता येऊ शकतात याविषयी सविस्तर माहिती दिली.
शेवटी अध्यक्ष मंगेश साळवी यांनी सर्वांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले.




