“मिशन फिनिक्स”अंतर्गत रत्नागिरी पोलीस दलाची अमली पदार्थ विरोधी धडक कारवाई

दापोली : पोलिसांनी तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला येथे पोलीस पथक व दोन पंचासह अंमली पदार्थ विरोधी कारवाईसाठी छापा टाकण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत ३ संशयित ताब्यात घेण्यात आले असून, आणखी एकाला ठाणे येथून ताब्यात घेण्यात येणार आहे. या गुन्ह्यात एकूण ५.७२९ किलो ग्रॅम वजनाचा २२ लाख ९२ हजार ४०० किंमतीचा चरस सदृश्य अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे. या संदर्भात अधिक तपास सुरू असून आणखीन संशयित निष्पन्न होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांना प्रतिबंध व कारवाई करण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाणे यांना सूचना दिल्या आहेत.
त्याप्रमाणे १५ सप्टेंबर रोजी दापोली पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी महेश तोरसकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे केळशी किनारा मोहल्ला येथे पोलीस पथक व दोन पंचासह अंमली पदार्थ विरोधी कारवाईसाठी छापा टाकला. या ठिकाणी अब्रार इस्माईल डायली (वय ३२, रा. केळशी किनारा मोहल्ला, ता. दापोली) याच्या राहत्या घराच्या मागील पडवीत चरस सदृश्य अंमली पदार्थ आढळला. घरच्या झडती घेतल्यानंतर एकूण ०.९९८ किलो ग्रॅम वजनाचा सुमारे चार लाख किंमतीचा चरस सदृश्य अमली पदार्थ सापडला. हा अंमली पदार्थ एका गडद लाल सोनेरी रंगाच्या प्लास्टिकच्या वेष्टनात आतून हिरव्या रंगाच्या पॅकिंग मध्ये ठेवलेला होता या वेष्टनावर इंग्रजीत सिक्स गोल्ड (6-Gold) व कोरियन भाषेत मजकूर लिहिलेला आढळला. यातील सर्व मुद्दे माल जप्त करण्यात आलेला असून अब्रार इस्माईल डायली याच्याविरुद्ध अमली पदार्थ कायद्यान्वये दापोली पोलीस ठाण्यामध्ये एन.डी.पी.एस. कलम ८(क), २० (ब) (ii) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दाखल गुन्ह्याचा कसून तपास करीत असताना अब्रार इस्माईल डायली याच्याकडे तपास केला असता त्याला केळशी मोहल्ला येथे वास्तव्यास असलेला अकिल अब्बास होडेकर, (वय ४९ वर्षे रा. उंबरशेत केळशी) याने हा चरस सदृश्य अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने दिला होता हे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी अकिल अब्बास होडेकर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्याकडे आणखी ४ पिशव्या असल्याबाबत तसेच त्या त्याने मंडणगड तालुक्यातील साखरी गावाचे समुद्र किनारी झुडुपात लपवून ठेवल्या असल्याचे कबूल केले. साखरी समुद्र किनारी जाऊन ४ पिशव्या पंचनामा करून ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत.
साखरी गावाचे समुद्र किनारी एकूण १८ लाख, ९२ हजार ४०० रुपये किंमतीचा ४.७३१ किलो ग्रॅम वजनाचा चरस सदृश्य अंमली पदार्थ मिळून आला आहे. या गुन्ह्यात एकूण ५.७२९ किलो ग्रॅम वजनाचा २२ लाख ९२ हजार ४०० रुपये किंमतीचा चरस सदृश्य अमली पदार्थ ताब्यात घेण्यात आला आहे.
तपासात या प्रकरणी आणखी एका व्यक्तीचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने तपासाअंती ताबीस महमूद डायली (वय ३० वर्षे रा. केळशी किनारा मोहल्ला) यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, शीळ डायघर पोलीस स्टेशन, ठाणे शहर येथे एन.डी.पी.एस. कलम 8 (क), 20 (ब) (ii) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यातील महमुद बदुद्दीन ऐनरकर (वय २९ रा. अपनानगर, खोंडा दापोली ता. दापोली जि. रत्नागिरी) याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न होत असून, त्याला ठाणे न्यायालयाकडून ताब्यात घेण्यात येणार आहे. महमुद ऐनरकरकडे देखील यासंदर्भात कसून चौकशी करण्यात येणार आहे. अंमली पदार्थ गुन्ह्याचे अनुषंगाने आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असून अधिक तपास सुरू आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. महामुनी, खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक श्री. यादव, पोलीस उपनिरीक्षक श्री. पाटील, स.पो.फौ श्री. गायकवाड, पो.हवा श्री. मोहिते, पो.हवा श्री. ढोले, पो.शि श्री. भांडे, पो.शि श्री. टेमकर, पो.थि. श्री. दिडे, म.पो.शि श्रीमती पाटेकर यांनी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button