एका बॅगने घेतले पाच जीव? मुंब्रा लोकल अपघात प्रकारणात चौकशी समितीचा नवा खुलासा!

मुंबई : यावर्षी जूनमध्ये झालेल्या मुंब्रा लोकल अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू तर आठ प्रवासी जखमी झाले होते. आता हा अपघात प्रवाशाच्या बॅगमुळे झाल्याचे समोर आले असून, मध्य रेल्वेच्या चौकशी समितीने याला दुजोरा दिला आहे. या खुलास्यानंतर लवकरच अहवाल तयार करून तो मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे सादर केला जाणार आहे.

या दुर्दैवी अपघातानंतर प्रवाशांमध्ये शंका व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे दुर्घटनेमागचे नेमके कारण शोधण्यासाठी मध्य रेल्वेने पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली होती. प्राथमिक निष्कर्षानंतर जवळपास तीन महिने उलटल्यावर आता समितीकडून रेल्वे प्रशासनाकडे अहवाल सादर केला जात आहे.

सध्या मिळालेल्या माहितीनुसार, सीएसएमटी-कर्जत लोकलच्या नवव्या आणि दहाव्या डब्याच्या पायदानावर उभ्या असलेल्या प्रवाशाकडे सुमारे 30 सेंमी जाडीची बॅग होती. ही बॅग समोरून येणाऱ्या कसारा-सीएसएमटी लोकलच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डब्याच्या पायदानावर उभ्या प्रवाशांना लागली. त्यामुळे प्रवासी एकमेकांवर आदळले आणि काही लोकलमध्ये; तर काही रुळांवर पडले. कसारा-सीएसएमटी लोकलच्या काचांवर आलेले ओरखडेही या बॅगमुळे झाले असावेत, असे समितीतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लहान कारण मोठ्या अपघाताचे कारण

कर्जत लोकलमधील प्रवासी पायदानावर उभा असताना बॅग सावरण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा तोल गेला आणि तो समोरून येणाऱ्या कसारा-सीएसएमटी लोकलवर आदळला. त्यामुळे त्याच डब्यातील आणखी काही प्रवासी खाली पडले. ताशी १५० किमी वेगाने लोकल धावत असताना दोन्ही गाड्यांमध्ये फक्त साधारण ०.७५ मीटर अंतर असते. अशा वेळी अगदी लहान कारणदेखील मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकते, असे निरीक्षण रेल्वे अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे.

मुंब्रा दुर्घटनेचा अहवाल मंजूर झाल्यावर तो रेल्वे मंडळाकडे पाठवला जाणार आहे. या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी चौकशी समितीने केलेल्या शिफारशींमध्ये पायदानावर प्रवास करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई, प्रलंबित ऐरोली-कळवा उन्नत रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करणे आणि नव्या मार्गिका उभारणे यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button