आशिया चषकाची ट्रॉफी न स्वीकारण्याच्या भारताच्या निर्णयावर भडकले संजय राऊत; म्हणाले, “तुम्ही देशाला मूर्ख बनवताय का?”

: आशिया चषक २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला आहे. या विजयानंतर भारतीय संघावर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला आहे. दरम्यान पहलहाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळू नये यासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले होते. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने खेळले गेले, आता ही स्पर्धा संपल्यानंतर पक्षाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा या संदर्भात भाष्य केले आहे.

भारतीय संघाने सामन्यानंतर पाकिस्तान सरकारमधील मंत्री आणि एशियन क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून आशिया चषकाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. याबद्दल राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. यावर राऊतांनी हे एक नाटक असल्याचे म्हटले आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

संजय राऊत म्हणाले की, “ही नौटंकी आहे. तुम्ही मैदानावर एकत्र खेळताय. ज्याला देशाचा विरोध आहे. लोकांनी किंवा राष्ट्रभक्तांनी कालचा सामना पाहिलेला नाही. काल पीव्हीआर आणि इतर अनेक ठिकाणी सामना दाखवण्याचा प्रयत्न झाला ते लोकांनी हाणून पाडला. आधीच्या मॅचमध्ये पाकिस्तानच्या संघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला… अरे त्या मैदानावर खेळलात ना?”

राऊत पुढे बोलताना म्हणाले की, “काल तुम्ही जिंकलात असं मला कळलं… काल तुम्ही जिंकलात तेव्हा तेव्हा पाकिस्तानचे मंत्री आहेत मोहसीन नक्वी, जे एशियन क्रिकेट काउंसिलचे अध्यक्ष आहेत. काल तुम्ही त्यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, अरे पण तुम्ही खेळलात… तुम्ही खेळलात आणि १५ दिवसांपूर्वी त्याच मोहसीन नक्वींबरोबर याच भारतीय संघाने फोटो काढले, हस्तांदोलन केलं, ड्रेसिंग रूममध्ये किंवा कुठल्या तरी एका कार्यक्रमात…. मग तुम्ही देशाला मूर्ख बनवताय का? बाहेरचं मैदानावरचं एक रुप वेगळं आहे आणि आतलं रूप वेगळं आहे. तुम्ही कोणाला मूर्ख बनवत आहात? तुम्ही आपल्या पंतप्रधानांकडून प्रेरणा घेतली आहे का लोकांना मूर्ख बनवण्याची? असा संतप्त सवाल राऊतांनी यावेळी विचारला.

तुम्ही का खेळलात हा आमचा मूळ प्रश्न आहे. तुम्ही खेळायाला नको होतं. आमच्या हुतात्म्याचा आणि मारले गेले त्यांचा हा अपमान आहे, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचे १४७ धावांचे लक्ष्य पाच विकेट्स आणि दोन चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले. यामध्ये तिलक वर्माने ५३ चेंडूत तीन चौकार आणि चार षटकारांसह नाबाद ६९ धावांची खेळी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button