
असं कधीच पाहिलं नाही, आम्हीच जिंकलेली ट्रॉफी आम्हाला दिली नाही…’ सूर्यकुमार यादव,माझे खेळाडूच माझ्या ट्रॉफी”
भारतीय संघाने आशिया कप २०२५ स्पर्धा जिंकली आहे, मात्र विजयाची ट्रॉफीच संघाला मिळालेली नाही. यामागे कारण ठरले आशियाई क्रिकेट काऊन्सिलचे (ACC) अध्यक्ष मोहसिन नक्वी. त्यांनी अंतिम सामन्यानंतर बालिश कृत्य केल्याने भारतीय संघाला अद्याप ट्रॉफीच मिळाली नाही. यावर सामन्यानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवनेही नाराजी व्यक्त केली.
आशिया कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला ५ विकेट्सने पराभूत केले. या विजयासह भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात आशिया कपवर नाव कोरले.
मात्र नक्वी हे जरी ACC चे अध्यक्ष असले तरी ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचेही अध्यक्ष आहेत, तसेच सध्याच्या पाकिस्तानच्या सरकारमध्येही ते अंतरिम मंत्री आहेत. त्यामुळे भारतीय संघाने त्यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.
मात्र भारतीय संघाने त्यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी चक्क आशिया कपची ट्रॉफी आणि भारतीय संघाचे मेडल्स त्यांच्या हॉटेलमध्ये नेले. त्यामुळे भारतीय संघाला त्यांचे मेडल्स आणि ट्रॉफी मिळालीच नाही.
सामन्यानंतर आधीच तासभर उशिराने मॅच प्रेझेंटेशनला सुरुवात झाली. या प्रेझेंटेशनमध्ये उपविजेत्या पाकिस्तानी संघाला मेडल्स देण्यात आले. त्यानंतर तिलक वर्माला सामनावीर, अभिषेक शर्माला मालिकावीर पुरस्कार देण्यात आले. मात्र त्यानंतर प्रेझेंटेटर सायमन डौल यांनी माहिती दिली की ACC ने कळवलं आहे की भारतीय संघाला आज कोणतेही बक्षीस मिळणार नाही.
पण सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने याबाबत स्पष्ट निराशा व्यक्त केली. तो म्हणाला, सगळीकडे चॅम्पियन्स लिहिलंय, त्यामुळे आम्ही जिंकलो, हे स्पष्ट आहे.
तसेच तो म्हणाला, ‘मी जेव्हापासून क्रिकेट पाहतोय आणि खेळतोय, तेव्हापासून मी असं कधीच पाहिलं नाही की विजेत्या संघालाच ट्रॉफी देण्यास नाकारण्यात आलं आहे. ती ट्रॉफी आम्ही मेहनतीने जिंकलेली होती. हे सोपं नाही. आम्ही सलग दोन चांगले सामने खेळलो होतो. मला वाटतं आम्ही त्या ट्रॉफीसाठी पात्र आहोत. मला फार काही बोलायचे नाही, मला वाटतं मी स्पष्ट काय ते सांगितलं आहे.’
“माझे खेळाडूच माझ्या ट्रॉफी”
सूर्यकुमार पुढे म्हणाला, ‘जर मला तुम्ही ट्रॉफीबद्दल विचाराल, तर माझ्याकडे ड्रेसिंग रुममध्ये १४ आहेत. माझे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ माझ्या खऱ्या ट्रॉफी आहेत. त्यांच्या आशिया कपमधील प्रवासाबाबत मला फार कौतुक आहे. त्या प्रवासातील आठवणी मी परत घेऊन जाणार आहे आणि त्या माझ्यासोबत कायम राहतील.’




