
हातखंबा परिसरात पुन्हा अपघात, कठड्याला धडक दिल्याने पलटल्याने कार पेटली ,सुदैवाने प्राणहानी नाही.
हातखंबा परिसरात आज पुन्हा अपघात घडला असून कठड्याला कार धडकल्याने कारपेंटी होऊन हा अपघात घडला
सिंधुदुर्गातून मुंबईकडे जाणाऱ्या एका कारने रत्नागिरी-पाली मार्गावरील हातखंबा टॅप जवळ दुपारच्या सुमारास अचानक रस्त्यावरील कठड्याला धडक दिली आणि गाडी रस्त्यावर पलटी होऊन जागेवरच पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने, या भीषण अपघातात गाडीतील आठ महिन्यांच्या चिमुकल्यासह चारही प्रवासी सुखरूप बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मुरलीधर प्रभू देसाई (४०, सिंधुदुर्ग) हे आपल्या ताब्यातील (MH-07 Q 8032) क्रमांकाची कार घेऊन गोव्याहून मुंबईकडे निघाले होते. हातखंबा-पाली परिसरात रस्त्यावर सुरू असलेल्या कामामुळे मार्गात बदल करण्यात आलेला आहे. मात्र, चालकाला रस्त्यावरील मार्ग बदलाचा सूचना देणारा बोर्ड दिसला नाही. यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव वेगातील गाडी थेट समोर असलेल्या दगडाच्या कठड्यावर जोरदार आदळली. धडक इतकी भीषण होती की, गाडी जागेवरच पलटी झाली आणि काही क्षणातच गाडीने पेट घेतला. या अपघातात चालक डॉ. मुरलीधर देसाई जखमी झाले. त्यांच्यासोबत असलेली आठ महिन्याची त्रिशा किरकोळ जखमी झाली. तर मिहिर प्रभुदेसाई (१०) हा किरकोळ जखमी झाला.




