
सावर्डे पोलीस निरीक्षकांच्या मनमानी कारवाईविरोधात तक्रार दाखल करणार -जिल्हाध्यक्ष संदीप सावंत
*चिपळूण तालुक्यातील प्रसिद्ध श्री शारदादेवी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुरंबव मार्गावरील वाहतूक बदलावरून मोठा वाद उफाळून आला आहे. सावर्डे पोलीस निरीक्षकांनी जिल्हा प्रशासन, आर.टी.ओ. अथवा पोलिस अधीक्षकांची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता फक्त मंदिर ट्रस्टच्या एका पत्राच्या आधारे रस्ते बंद करून एकेरी वाहतूक सुरू केली, असा गंभीर आरोप अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यांनी केला आहे. या कृतीच्या निषेधार्थ त्यांनी थेट तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
तुरंबव येथील श्री शारदादेवीच्या नवरात्र उत्सवासाठी दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात. यावर्षी पोलीस प्रशासनाने निवळी व अबीटगाव रस्ते पूर्णतः बंद करून एकेरी वाहतूक लागू केली, ज्यामुळे भाविकांना १० ते १५ किलोमीटरचा अतिरिक्त वळसा घालावा लागतो. यामुळे प्रवाशांचा वेळ व पैसा वाया जात असून वृद्ध, महिलांनाही त्रास सहन करावा लागत आहे, असा आरोप सावंत यांनी केला.
संदीप सावंत यांनी सदर निर्णयाविरोधात प्रशासनाकडे निवेदन सादर करून रस्ते पूर्ववत खुले करण्याची मागणी केली होती. प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास बोंबाबोंब आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने त्यांना समजविण्यासाठी बोलावले, मात्र सावंत आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. यानंतर त्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली.
यानंतर संदीप सावंत यांनी उपविभागीय अधिकारी चिपळूण यांच्याकडे आंदोलनासाठी परवानगी मागितली, परंतु जिल्ह्यात मनाई आदेश लागू असल्याने ती परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी शनिवारी नियोजित केलेले आंदोलन स्थगित केले.
मात्र सावंत यांनी आता थेट सावर्डे पोलीस निरीक्षकांच्या भूमिकेवरच सवाल उपस्थित केला आहे. “रस्ते बंद करताना कोणतीही शासकीय परवानगी न घेता केवळ मंदिर ट्रस्टच्या पत्रावर कारवाई केली गेली, ज्यामुळे हजारो भाविकांचे नुकसान झाले, आरोग्यासही धोका निर्माण झाला,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर संदीप सावंत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, पालकमंत्री उदय सामंत तसेच पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करून सावर्डे पोलीस निरीक्षकांवर कारवाईची जोरदार मागणी केली आहे.




