
लांजात घनकचर्याला गावागावात होणार्या विरोधामुळे नगरपंचायतीची डोकेदुखी वाढली.
लांजा नगरपंचायतीसमोर घनकचरा व्यवस्थापनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस हा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. धुंदरे, कोत्रेवाडी आणि कुवे येथील जागांना स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवल्यानंतर काही दिवसांपूर्वी खेरवसे गावात कचरा टाकण्यात आला होता. मात्र तेथूनही विरोधाचा भडका उडाला. पाठोपाठ होणार्या विरोधामुळे नगरपंचायतीची डोकेदुखी वाढली आहे. घनकचरा प्रकल्प उभारण्याचे मोठे आव्हान नगरपंचायतीसमोर आहे. घनकचरा प्रकल्पाविरोधात कोत्रेवाडी येथील नागरिकांचे साखळी उपोषण सलग ४२ दिवस सुरू आहे. प्रकल्प रद्दचे पत्र मिळाल्याशिवाय उपोषण थांबवणार नाही, या निर्णयावर नागरिक ठाम आहेत. स्थानिक प्रशासनासोबत वेळोवेळी बैठका होऊनही तोडगा निघालेला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सुद्धा सर्वमान्य तोडगा निघालेला नाही. परिणामतः उपोषण सुरू आहे.www.konkantoday.com




