
मानधन थकले; रत्नागिरी जिल्ह्यातील १०५ तदर्थ वैद्यकीय अधिकारी आर्थिक अडचणीत
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तदर्थ स्वरूपात काम करणाऱ्या १०५ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मागील चार महिन्यांचे मानधन थकलेले असून, त्यामुळे हे अधिकारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
एकीकडे आरोग्य क्षेत्रासाठी शासन नवनवीन योजना जाहीर करत असताना, प्रत्यक्षात जिल्हा परिषदेकडे शासनाकडून अनुदान न आल्याने या डॉक्टरांना मानधन देता येत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद अंतर्गत ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. त्यासाठी १३३ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असली तरी, केवळ २५ अधिकारीच कार्यरत आहेत. उर्वरित रिक्त पदांमुळे आरोग्य सेवेवर परिणाम होऊ नये म्हणून बीएएमएस आणि एमबीबीएस पदवीधारक १०५ डॉक्टरांची तदर्थ नियोजनावर नियुक्ती करण्यात आली आहे.
मात्र, या तदर्थ अधिकाऱ्यांचे मानधन चार महिने थकले असून, वेतन मिळावे म्हणून त्यांना वारंवार जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे उंबरे झिजवावे लागत आहेत. शासनाकडे वेळोवेळी अनुदानाची मागणी करण्यात आली असली तरी, अद्याप निधी प्राप्त झालेला नाही, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.




