
‘लोटिस्मा’चे आदर्श वाचक पुरस्काराचे रविवारी वितरण होणारआ. निकम यांची उपस्थिती; ‘कृत्रिम बुद्धिमता’ यावर डॉ. प्रतिक ओक यांचे व्याख्यान
चिपळूण :: येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या आदर्श वाचक पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे. यावर्षीचे वाचक पुरस्कार हे वाचनालयाचे सभासद श्रीकांत फडके, वैभव खेडेकर, वीणा सावंत, सुलोचना खातू यांना जाहीर करण्यात आले आहेत. याच कार्यक्रमात नुकतीच विद्यावाचस्पती ही पदवी मिळवलेल्या डॉ. प्रतिक विनायक ओक यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण आणि सत्कार सोहोळा वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात रविवार, २८ रोजी सायंकाळी ५.३० वाजता चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे आमदार आणि वाचनालयाचे हितचिंतक शेखर निकम यांच्याहस्ते होईल. प्रतिक ओक हे पी.एच.डी.साठी निवडलेल्या ‘कृत्रिम बुद्धिमता’ या विषयावर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे व्याख्यान देणार आहेत. प्रतिक हे वाचनालयाच्या संचालक मंडळातील ज्येष्ठ संचालक आणि सहकार्यवाह विनायक ओक यांचे सुपुत्र आहेत.
या कार्यक्रमाला शहरातील नागरिक, वाचनप्रेमी आणि वाचनालयाच्या हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोटिस्मा’च्या कार्यक्रम समितीने केले आहे.




