प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, जिल्ह्यातील १ हजार १९१ ग्राहक झाले स्वावलंबी


प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेत महावितरण रत्नागिरी जिल्ह्यातील १ हजार १९१ ग्राहक विजेबाबत स्वावलंबी झाले आहेत. त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनेलच्या माध्यमातून ४.२१ मेगावॅट इतकी वीज निर्मिती होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या कालावधीतील सेवा पर्वात ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणार्‍या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणतर्फे विशेष अभियान राबविण्यात येत आहे.  जिल्ह्यातील जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी मंडलाचे अधीक्षक अभियंता सुनिलकुमार माने यांनी केले आहे.
केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेस वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिट वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत मिळत आहे. घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौर ऊर्जानिर्मिती संच बसवता यावा, यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. याबरोबरच महावितरणकडून १० किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. सौर नेट मीटरदेखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.
एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेनुसार महिना अंदाजे १२० युनिट वीजनिर्मिती होते. वीज ग्राहकांच्या गरजेपेक्षा अधिक वीज सौर ऊर्जा प्रकल्पातून तयार झाल्यामुळे वीजबिल शून्य होते तसेच अतिरिक्त वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळविता येते. छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना पहिल्या दोन किलोवॅटसाठी प्रत्येकी ३० हजार रुपये आणि तीन किलोवॅट आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. हाउसिंग सोसायट्यांनाही ५०० किलोवॅटपर्यंत प्रती किलोवॅट १८ हजार रुपये अनुदान मिळते.
पीएम  सूर्यघर योजनेत सौर ऊर्जा संच बसविणार्‍या ग्राहकांना जवळपास मोफत वीज मिळत आहे. शासनाकडून अनुदान मिळणार्‍या या योजनेचा घरगुती ग्राहक व निवासी संकुलांनी लाभ घ्यावा. महावितरणकडून यासंबंधातील सर्व प्रक्रिया ऑनलाईन व सुलभ करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button