
संगमेश्वर तालुक्यातून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या विवाहितेचा मृतदेह गोवळकोट खाडी परिसरात आढळला
संगमेश्वर तालुक्यातून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या विवाहितेचा मृतदेह 25 सप्टेंबर रोजी गोवळकोट खाडी परिसरातील मजरेकाशी बेटानजीक आढळून आला. अपेक्षा अमोल चव्हाण ही विवाहिता मंगळवारी सायंकाळी 4 वाजल्यापासून बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने संगमेश्वर पोलिस ठाण्यात नोंदवली होती.दोन दिवसानंतर तिचा मृतदेह मजरेकाशी येथे आढळला असून, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.
संगमेश्वरमधून मंगळवारी दुपारी 4 च्या सुमारास अपेक्षा चव्हाण ही विवाहिता घरात कोणालाही न सांगता निघून गेली होती. दरम्यान, पती अमोल चव्हाण यांनी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार संगमेश्वर पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार तांत्रिक तपास अंतर्गत तिचे शेवटचे लोकेशन चिपळूण शहरातील गांधारेश्वर पुलावर आढळून आले होते.अधिक तपास केला असताना त्या ठिकाणी एका महिलेची पर्स व चप्पल तसेच मोबाईलही आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी गांधारेश्वर परिसरात तपास केला; मात्र अपेक्षा चव्हाण जवळपास आढळून आली नव्हती. दरम्यान, गुरुवारी अपेक्षा हिचा मृतदेह मजरेकाशी परिसरात आढळून आल्यावर पोलिसांनी तो ताब्यात घेतला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे




