
रत्नागिरी शहरानजीकच्या मिऱ्या-आलावा समुद्रकिनारी मृत व्हेल माशाचे अवशेष आढळले
रत्नागिरी शहरानजीकच्या मिऱ्या-आलावा समुद्रकिनारी मृत व्हेल माशाचे अवशेष आढळून आले आहेत. सुमारे ४२ फुटी हा मासा असून तो पूर्ण सडला आहे. स्थानिक रहिवाशांना मिऱ्या किनारी तीव्र कुजकट वास येत असल्याने त्यांनी किनाऱ्याची पाहणी केली. तेव्हा त्यांना किनाऱ्यावर आक्राळविक्राळ मृत व्हेल माशाचे अवशेष आढळून आले.
वन विभागाच्या कांदळवन क्षेत्रपाल किरण ठाकूर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या माहितीवरून घटनास्थळी जाऊन खात्री केली. तेव्हा हा महाकाय व्हेल मासा पूर्ण सडलेल्या अवस्थेत अलावा किनाऱ्यावरील दगडावर असल्याचे आढळून आले. यापूर्वी देखील रत्नागिरी, मालगुंड आणि गणपतीपुळे किनाऱ्यावर अशा प्रकारचे मृत व्हेल मासे आणि त्यांचे अवशेष आढळले होते. वारंवार अशा घटना घडत असल्याने, कोकण किनारपट्टीवरील समुद्री पर्यावरणाचे आणि समुद्री जीवांचे आरोग्य धोक्यात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे




