चिपळूणच्या संध्या संतोष दाभोळकर यांनी जगप्रसिद्ध बीएमडब्ल्यू बर्लिन वर्ल्ड मॅरेथॉन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे केले प्रतिनिधित्व


चिपळूण शहरालगतच्या खेर्डी गावातील क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट, पर्सनल ट्रेनर रेपस इंडिया तसेच न्यूट्रो जेनीमिक्स कौन्सिलर सौ. संध्या संतोष दाभोळकर यांनी नुकतेच जगप्रसिद्ध बीएमडब्ल्यू बर्लिन वर्ल्ड मॅरेथॉन (४२ कि.मी.) या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

या स्पर्धेसाठी भारतातून केवळ दोन महिला धावपटूंना संधी मिळाली होती, त्यामध्ये संध्या दाभोळकर यांची निवड होणे ही चिपळूणसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या त्या चिपळूणमधील पहिल्या व एकमेव महिला धावपटू ठरल्या आहेत.

खेर्डी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर संतोष दाभोळकर यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत. गेली सलग बारा वर्षे त्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये इंटरनॅशनल रनर म्हणून धावत आहेत. टाटा अल्ट्रा इंटरनॅशनल, टीसीएस बंगलोर (५ वेळा), एअरटेल दिल्ली रन (३ वेळा), वाशी, ठाणे, सातारा हिल मॅरेथॉन यांसह देशातील अनेक नामवंत शर्यतींमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे.

त्यांची कारकीर्द अनेक मानाच्या यशांनी उजळलेली आहे. सचिन तेंडुलकर आयडीबीआय मॅरेथॉनच्या त्या सलग तीन वर्षे ब्रँड अॅम्बेसिडर होत्या. नायकी ब्रँडच्या अॅम्बेसिडर म्हणूनही त्यांनी काम केले. कोकण बीच मॅरेथॉनमध्ये त्यांनी सलग चार वेळा विजेतेपद मिळवले. कुंडलिका रिव्हर मॅरेथॉनमध्ये दोन वर्षे विजेतेपद, कृष्णा डायमंड वूमन मॅरेथॉन (मुंबई) या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजय आणि नेव्ही मॅरेथॉन मुंबईत सात वर्षे सलग सहभाग हे त्यांच्या कामगिरीचे विशेष ठळक पैलू आहेत.

आजवर दोनशेहून अधिक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन विक्रम केलेल्या संध्या दाभोळकर यांची निवड बर्लिनसाठी होणे अपेक्षितच होते. २१ सप्टेंबर रोजी जर्मनीतील बर्लिन येथे ही स्पर्धा पार पडली. नुकत्याच त्या चिपळूणमध्ये दाखल झाल्या असून त्यांच्या या अभूतपूर्वयशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button