6.5 लाखांची सुपारी, मुंबईतल्या बड्या व्यापाऱ्याच्या हत्येचं गूढ उकललं, क्रूर मुलानेच आखला जन्मदात्याला संपवण्याचा कट!

मुंबई : बाप आणि मुलगा यांच्या नात्यातला ओलावा शब्दांत सांगता येईल का? अजिबात नाही. एक बाप आपल्या मुलांसाठी खूप कष्ट करतो. आपल्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल राहावं यासाठी अहोरात्र झटतो. वडील हा मुलाचा खूप मोठा आधार असतो. कधीकधी वडील मुलाला शिस्त लागावी यासाठी बाहेरुन कठोरपणे वागतो. पण वडिलांच्या मनात मुलाप्रती प्रचंड प्रेम आणि माया असते. अनेकदा आई बोलून किंवा रडून आपलं मन मोकळं करु शकते. मुलांना आपल्या प्रेमाची जाणीव करुन देऊ शकते. पण पिता हा खूप कणखर असतो. तो कधीच मुलांसमोर आपण खचलोय असं दाखवत नाही. तो मुलांसोबत कठोर वागेल पण मुलांसाठी तितकाच जीवही देऊ शकतो. पिता आणि मुलाच्या नात्याबाबत आपण शब्दांत सांगू शकत नाही. इतकं सुंदर हे नातं असतं. पण या नात्याला काळीमा फासणारी घटना मुंबईच्या चारकोप येथे समोर आली आहे.

अयूब सय्यद हे 65 वर्षांचे काचेची व्यापारी. ते रविवारी (21 सप्टेंबर) आपल्या कार्यालयातील केबिनमध्ये युट्यूबवर व्हिडीओ पाहत होते. पण अचानक त्यांच्या कार्यालयात धारदार शस्त्र घेऊन दोन इसम शिरले. अयूब यांना त्यांचा सुगावा लागेल त्याआधीच ते दोन्ही इसम त्यांच्या केबिनमध्ये शिरले. आरोपींनी कोणताही शब्द न बोलता थेट अयूब यांच्यावर धारधार चाकूने हल्ला केला. आरोपींनी अतिशय निर्घृणपणे अयूब यांना संपवलं. त्यांनी तब्बल 30 वेळा अयूब यांच्या शरीरात चाकू खुपसला आणि तो बाहेर काढला. अयूब यांचा मृत्यू झाल्याची पूर्ण खात्री त्यांनी केली आणि त्यानंतर ते त्या ऑफिसमधून बाहेर आले. या घटनेमुळे चारकोप परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पण पोलिसांच्या तपासात अतिशय धक्कादायक अशी माहिती समोर आली. कारण अयूब यांचा खून करणारा दुसरा तिसरा कुणी नसून तर त्यांचा चक्क पोटचा धाकटा मुलगा हनीफ सैय्यद असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आणि पोलिसांनादेखील धक्का बसला. अतिशय चक्रावून टाकणारी ही घटना आहे.

या प्रकरणात पोलिसांनी मृतक अयूब सैय्यद यांच्या धाकट्या मुलासह 3 आरोपींना अटक केली आहे. तर एक आरोपी फरार आहे. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. अयूब सैय्यद यांचा धाकटा मुलगा हनीफ सैय्यद यानेच आपल्या पित्याच्या हत्येचा कट आखला. हनीफ याने आरोपी सानू चौधरी याच्यासोबत हत्येची तारीख आणि वेळ निश्चित केला. चौधरीने गोवंडी इथल्या दोन तरुणांना हत्येसाठी 6.5 लाख रुपयांची सुपारी दिली होती. मृतक अयूब सैय्यद यांनी सानू चौधरी याचे 2 कोटी रुपये देण्यास नकार दिला होता. त्यामुळे या कटात तो देखील सहभागी झाला.

पित्याची हत्या का केली?

अयूब सैय्यद याची हत्या मुलाने का केली? याबाबतही माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. अयूब आपल्या मुलाला दुकानात येण्यास मनाई करायचा. तसेच दुकान विकून टाकणार अशी वारंवार धमकी द्यायचा. हनीफला भीती वाटत होती की, वडील हयात असताना आपल्याला कामाची जबाबदारी देणार की नाहीत. तसेच आपले पिता दुसऱ्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करतात पण पोटच्या मुलाकडे दुर्लक्ष करतात, अशा विचाराने हनीफ नाराज होता. याच नाराजी आणि लालसेपोटी त्याने आपल्या पित्याच्या हत्येचा कट रचला.

घटना घडली तेव्हा अयूब सैय्यद आपल्या ऑफसमधील कॅबिनमध्ये बसले होते. ते केबिनमध्ये बसून यूट्यूबवर व्हिडीओ बघत होते. त्याचवेळी आरोपी मोहम्मद खैरुल इस्लाम आणि त्याचा एक साथीदार अयूब यांच्या केबिनमध्ये शिरले. त्यांनी धारदार चाकून अयूब यांच्यावर तब्बल 30 वेळा चाकूने वार केले. हत्येनंतर आरोपींनी सानू चौधरी याला मेसेज केला की, काम होऊन जाईल. यानंतर चौधरीने आरोपींसाठी ऑनलाईन ऑटो बुक केली आणि यूपीआयद्वारे पैसे दिले.

हत्येची घटना उघड झाल्यानंतर मुंबई पोलीस झोन 11 चे डीसीपी संदीप जाधव, एसीपी विनायक चव्हाण यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच मोबाईल डिटेल्सच्या आधारावर पोलिसांनी सानू चौधरी याला अटक केली. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. तसेच अयूब यांच्या मुलानेच हत्येचा कट रचल्याचं उघड झालं. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली. हनीफ सैय्यद, सानू चौधरी आणि खैरुल इस्लाम या आरोपींना अटक केली आहे. तर एक आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button