मुंबई मराठी साहित्य संघात लोढा आणि भाजप पॅनेलला मतदारांनी नाकारले!

मुंबई : मुंबईत गेली आठ दशके साहित्य व नाट्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या गिरगावातील ‘मुंबई मराठी साहित्य संघा’च्या पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीचा अंशत: निकाल शुक्रवारी समोर आला असून संघाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या ‘ऊर्जा पॅनेल’ला मतदारांनी पुन्हा कौल दिला आहे. ‘ऊर्जा पॅनेल’च्या उषा तांबे अध्यक्षपदी विजयी झाल्या असून या पॅनेलचे सात पैकी पाच उमेदवार उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत.

संघाच्या निवडणुकीत १७ सप्टेंबर पर्यंत टपाली मतदान पार पडले. १४०० मतदारांपैकी ४४७ मतदारांनी मतदानात भाग घेतला. अध्यक्षपदाच्या चुरशीच्या निवडणुकीत ‘ऊर्जा पॅनेल’च्या उषा तांबे यांना ३३४ तर ‘भालेराव विचार मंच’चे किशोर रांगणेकर यांना २९१ मते पडली. उपाध्यक्ष पदी ‘ऊर्जा पॅनेल’चे विजय केंकरे, अशोक कोठावळे, अनिल बांदिवडेकर, सुदेश हिंगलासपूरकर आणि रेखा नार्वेकर हे विजयी झाले आहेत तर ‘भालेराव विचार मंच’चे जयराज साळगावकर आणि मधुकर वर्तक असे दोघे उपाध्यक्षपदी निवडून आले.

३० मतपत्रिकांवर आक्षेप असल्याने त्या बाजुला ठेवण्यात आल्या आहेत. अद्याप नियामक मंडळाच्या ३५ जागांची मतमोजणी बाकी आहे. संपूर्ण मतमोजणी शनिवारी रात्री उशिरापर्यंत होईल, असे निवडणूक अधिकारी यशोधर दिवेकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. ३५ सदस्यांच्या नियामक मंडळातून १२ सदस्यांची कार्यकारणी निवडली जाते. ही कार्यकारणी संघाचा कार्याध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि प्रमुख कार्यवाह निवडते. संघाच्या कारभारात कार्याध्यक्षांना सर्वाधिक अधिकार आहेत. गेली सात वर्षे उषा तांबे कार्याध्यक्ष होत्या.

मतदारांचा कल पाहता नियामक मंडळाच्या मतमोजणीत ‘ऊर्जा पॅनेल’ला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. ‘भालेराव विचार मंच’कडून प्रमोद पवार, नरेंद्र पाठक आणि सारंग दर्शने मुख्य सुत्रधार होते. संघ परिवार विरुद्ध नेमस्त मंडळी असा रंग या निवडणुकीला होता. ही निवडणूक साहित्यबाह्य कारणांनी गाजली. ‘भालेराव विचार मंच’ हा भाजप पुरस्कृत पॅनेल असल्याचा आरोप झाला. राज्याचे मंत्री व भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांना साहित्य संघ इमारतीच्या पुनर्विकासात रस आहे, म्हणून ते ‘भालेराव विचार मंच’ला मदत करत आहेत. असे जाहीर आरोप करण्यात आले.

पवारांची मतपत्रिका वादात

‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे अध्यक्ष शरद पवार हे साहित्य संघाचे सदस्य आहेत. मतदारांना टपाली किंवा परहस्ते मतपत्रिका पाठवण्याची मुभा आहे. मात्र पत्रिका आणणाऱ्या प्रतिनिधीचे मतपत्रिकेसोबत ‘आधार’ बंधनकारक आहे. शरद पवार यांची मतपत्रिका ज्या व्यक्तीने संघात आणली, त्याचे पत्रीकेसोबत आधार होते. तरी त्यावर वाद झाला. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मात्र येवून संघात मतदान केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button