साईबाबा संस्थानच्या कारभाराची चौकशी करा – शिर्डी नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके यांची मागणी


राज्यातील सर्वांत श्रीमंत साईबाबा संस्थानच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी शिर्डी नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केली.

या वेळी त्यांनी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल केला. अभय शेळके म्हणाले की, शिर्डीमध्ये ग्रो मोअर या कंपनीत ८०० कोटींचा घोटाळा झाला. यात प्रामुख्याने साई संस्थानचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची सर्वाधिक गुंतवणूक असून यासाठी बड्या अधिकाऱ्यांनी कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रलोभने दाखविले होते.

अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा, तसेच संस्थानच्या भक्तनिवास असलेल्या दोनशे खोल्या येथील, साईबाबा रूग्णालयात सर्वं उपचार, शस्त्रक्रिया मोफत केल्या जात असताना रुग्णालयातील एक वैद्यकीय अधिकारी हे गोरगरीब रुग्णांना वेठीस धरून २० हजारापासून ते ५० हजार रुपये घेत आहेत. माझी तक्रार केली तर शस्त्रक्रिया माझ्या हातात आहे, मी काहीही करू शकतो, असा दम अनेक रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना देत असतात. अशा डॉक्टरांचे त्वरित निलंबन करण्याची मागणी शेळके यांनी केली आहे.

बहुचर्चित असलेला साईराम अर्थात भाविकांच्या पैशातून देश-विदेशातील सहली, पंचतारांकित हाँटेलमध्ये मौजमजा, महागडे गिफ्ट याचा लाभ घेणारे अधिकारी व कर्मचारी आजही वीस वर्षांपासून खुर्चीला चिटकून बसलेले आहेत. अशा लाभार्थी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या का होत नाहीत? जनसंपर्क कार्यालय, सुरक्षा विभाग, मंदिर विभाग येथील कर्मचारी भाविकांशी जवळीक वाढवून त्यांच्याकडून आजारपणाचे खोटे कारण सांगून लाखो रुपये घेतल्याचे प्रकरण का दडपण्यात आले? याकडे साईबाबा संस्थानचे प्रशासन दुर्लक्ष करत असून प्रशासनातील काही अधिकारी याला सामील आहेत, असाही आरोप शेळके यांनी केला आहे.

साईंच्या देणगीत २०२५ या वर्षात घट झाली. याचे स्पष्टीकरण संस्थान प्रशासनाने दिले पाहिजे, मंदिरातील पुजाऱ्यांना मारहाण, मंदिर प्रमुखांवरील आरोपांचे निष्कर्ष, तसेच अनेक मोठ्या देणगीदारांना आपल्या दालनात व घरी घेऊन जाणे, ही जवळीक कशासाठी, याचाही खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी शेळके यांनी केली.

संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्व घटनांना जबाबदार आहेत. त्यांच्या पूर्वपरवानगीमुळेच संस्थानमधील भ्रष्टाचार वाढल्याचा आरोपही शेळके यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button