
मालका कडून पगारासाठी टाळाटाळ चिपळूण मध्ये वृद्ध कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या
चिपळूण खेंड येथील युनिटी बिल्डिंग मधील राहत्या खोलीत ६३ वर्षीय नारायण सी. एम. (मूळ रहिवासी – कन्नूर, केरळ) या कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार, २२ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान घडली.
नारायण गेली २५ ते ३० वर्षे एका परप्रांतीय व्यावसायिकाच्या मालकीच्या बेकरी कारखान्यात कार्यरत होता. या कारखान्यातील अनेक कामगार तुटपुंज्या पगारावर काम करीत असून, खर्चासाठी उचल घेऊन बाकीची रक्कम वर्षातून एकदा किंवा तातडीच्या वेळीच दिली जाते. मात्र हिशोब करताना वारंवार कापत-पगार दिला जातो, अशा तक्रारी सहकाऱ्यांनी केल्या आहेत.
नारायण यांना गावी जाण्यासाठी हिशोब करून पगार हवा होता, मात्र मालकांनी तो टाळाटाळ केल्याने त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे. कामगारांचे म्हणणे आहे की, या कारखान्याच्या मालकांचे वरिष्ठ अधिकारी व राजकीय नेत्यांशी आर्थिक संबंध असल्याने कोणताही कायदेशीर कारवाईचा धोका पत्करला जात नाही.
या कारखान्याच्या शहरात आणि जिल्ह्यात बेकरी, मिठाई, नमकीन व विविध खाद्यपदार्थांची विक्रीची मोठी दुकाने आहेत. यापूर्वीही खराब गुणवत्तेबाबत तक्रारी झाल्या असून, त्या प्रकरणांना पैशाच्या जोरावर दडपण्यात आल्याचा आरोप आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृतदेह रात्रीतच पोस्टमार्टेम करून मूळगावी रवाना करण्यात आला.




