
संगमेश्वर-देवरुख-साखरपा या राज्यमार्गाची दुरवस्था, साडवलीत आज रास्ता रोको
संगमेश्वर-देवरुख-साखरपा या राज्यमार्गाची दुरवस्था झाली असून मार्ग जणू मृत्यूचा सापळा बनला आहे. याच्या निषेधार्थ साडवली येथे २४ रोजी सकाळी ११ वा. शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी दिली आहे. याबाबतचे निवेदन सोमवारी देवरुख पोलीस ठाण्याला देण्यात आले आहे.
संगमेश्वर-देवरुख-साखरपा हा १६ किमीचा मार्ग असून लाखो रुपये खर्चुन या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने अनेक ठिकाणी मार्गावर खड्डे पडले आहेत. हा मार्ग वाहतुकीस धोकादायक बनला आहे.
शासन व प्रशासनाच्या उदात्तिनत्तेमुळे या मार्गावरून प्रवास करणारे विद्यार्थी यांना शाळा, महाविद्यालयात वेळेत पोहोचता येत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. वाहन चालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे.
या मार्गाची डागडुजी होणे अत्यंत गरजेचे आहे. संबंधित विभागाला वारंवार मिवेदने देऊनही याकडे डोळेझाक केली जात आहे. डागडुजीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पदाधिकार्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे




