
श्री क्षेत्र टेरवच्या भवानी – वाघजाई मंदिरातील भव्य नवरात्रौत्सव
.

चिपळूण:- चिपळूणमधील दसपटी विभागातील श्री क्षेत्र टेरव येथे भाविक व पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या तसेच महाराष्ट्र शासनाने यात्रा स्थळ व पर्यटनाचा क दर्जा तसेच तीर्थक्षेत्राचा ब दर्जा बहाल केलेल्या व नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या कुलस्वामिनी श्री भवानी – वाघजाई मंदिरात दरवर्षी आदिशक्ती जगद्जननी श्री भवानी वाघजाई मातेचा भव्य नवरात्रौत्सव पारंपारिक रूढी परंपरेप्रमाणे धार्मिक विधी व पूजन करून उत्साहात साजरा होतो. मानकऱ्यांच्या हस्ते देवस्थानचे पुजारी विधीवत पूजा करून घेतात. नवरात्रीत दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी लोटत असते. रात्री उशीरापर्यंत पंचक्रोशीतील अनेक भगिनी मातेची ओटी भरण्यास येतात. उत्सवादरम्यान अभिषेक, पूजा – अर्चा, चंडीपाट, नवचंडी याग, हरिपाठ, संगीत भजन, हळदी कुंकू, गरबा दांडिया इ. धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पालखी सजवून रुपी लावण्यात येतात व देवीचे घट हलवून पालखी नाचवत मंदिरा भोवती प्रदक्षिणा घालून छबिना काढण्यात येतो. नवरात्रोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे मंदिरास नेत्रदीपक विद्युत रोषणाई तसेच प्रवेशद्वार व देवींचे गाभारे आकर्षक फुलांनी सजविण्यात येतात.
श्री भवानी, वाघजाई, कालकाई, महालक्ष्मी व कुलस्वामीनी या देवींना नवरंगाच्या साड्या परिधान करून सोन्या-चांदीच्या मौल्यवान अलंकारांनी सालंकृत करण्यात येते.
सदर मंदिर चिपळूण शहरापासून ८ कि.मी अंतरावर तसेच मुंबई-गोवा महामार्गावरुन कामथे येथून २.५ कि.मी
अंतरावर आहे. कामथे, खेर्डी, कातळवडी तसेच धामणवणे येथून या देवस्थानात येण्यासाठी मार्ग आहेत. मंदिराच्या दक्षिणेकडील गाभार्यात मुख्य देवता महिषासुरमर्दिनीच्या रुपातील श्री कुलस्वामिनी भवानीची साडेसात फूट उंचीची, अडीच
टन वजनाची अतिशय सुंदर, रेखीव व तेजस्वी अशी दशभुजामूर्ती प्रतिष्ठापित केली आहे.
आई भवानीच्या उजव्या बाजूला भैरीची मूर्ती तर डाव्या बाजूला महालक्ष्मीची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. या मंदिराच्या
उत्तरेकडील गाभाऱ्यामध्ये ग्रामदेवता श्री वाघजाईची सुंदर व रेखीव अशी मूर्ती आहे. तिच्या उजव्या बाजूला केदाराची
मूर्ती असून डाव्या बाजूला कुलस्वामिनी व स्वयंभू कालिका मातेचे स्थान आहे. या मंदिराच्या पूर्वेकडील गाभाऱ्यामध्ये
नव्याने शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धीदात्री या
नवदुर्गांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच पश्चिमेकडील गाभा-यामध्ये श्री महादेवाच्या पिंडीची प्रतिष्ठापना
करुन त्यासमोर श्री गणेशाची मूर्ती आहे.
दसऱ्याला ग्रामस्थ मंदिरात सोने लुटून, परस्परांना वाटून एकमेकांना शुभेच्छा देतात व अश्या प्रकारे नवरात्रोत्सवाची सांगता होते.




