
रत्नागिरीत 1 ऑक्टोबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव
‘शताब्दी वर्ष' विविध कार्यक्रमांनी साजरे करणार
रत्नागिरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रत्नागिरी शहराचा विजयादशमी उत्सव येत्या १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.४५ वाजता स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहामध्ये साजरा होणार आहे.
‘व्यक्ती निर्माणातून राष्ट्रनिर्माण’ हा विचार घेऊन १९२५ साली विजयादशमीच्या मुहूर्तावर डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. संघाच्या कार्याला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने येत्या विजयदशमी पासून पुढील एक वर्ष ‘शताब्दी वर्ष’ म्हणून विविध कार्यक्रमांनी साजरे करण्याचे संघाने ठरविले आहे. पुढील वर्षभरात टप्प्याटप्प्याने व्यापक गृहसंपर्क अभियान, हिंदू संमेलन, सामाजिक सद्भाव बैठक, प्रमुख नागरिक संवाद, युवकांसाठी कार्यक्रम आणि शाखा सप्ताह असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातील.
दैनंदिन शाखांमधून स्वयंसेवकांवर प्रखर देशभक्ती, शिस्तबद्धता, निष्कलंक चारित्र्य आणि निस्वार्थ समाजसेवेचे उत्तम संस्कार केले जातात. यातूनच स्वयंसेवकांचे सर्वांगसुंदर असे व्यक्तिमत्व घडत असते आणि समाजातील अगदी सामान्य वाटणारी माणसे असामान्य असे कार्य उभे करतात. अशाच पद्धतीने संघ स्वयंसेवकानी देशभरात व देशाबाहेरही एक लाखांपेक्षाही अधिक समाजोपयोगी सेवा कार्ये उभी केली आहेत.
रत्नागिरी शहरामध्ये गेली सुमारे ७५ वर्षांपेक्षा अधिक काळ शाखा व साप्ताहिक मिलनांच्या माध्यमातून संघकार्य चालू आहे. वर्ष प्रतिपदा, हिंदू साम्राज्य दिन, गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन, विजयादशमी आणि मकर संक्रांती असे सहा उत्सव संघातर्फे दरवर्षी साजरे केले जातात. अशा कार्यक्रमांमधून, आपल्या देशाला सामर्थ्यसंपन्न व वैभवसंपन्न बनविण्यासाठी समाजाला संघटित होण्याचे व सकारात्मक परिवर्तनाचे आवाहन केले जाते. कुटुंब संवाद, पर्यावरणाचे रक्षण, समरसतायुक्त समाज, ‘स्व’त्व जागृती आणि नागरी शिष्टाचाराचे पालन अशा पाच मुद्द्यांच्या आधारे समाजजागृती करण्यावर संघाकडून येत्या वर्षभरात विशेष भर दिला जाणार आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला होणा-या या कार्यक्रमात, प्रदर्शन, विविध प्रात्याक्षिके, ज्येष्ठ स्वयंसेवकांचे मनोगत, व्याख्यान आणि भारतमातेची प्रार्थना असे कार्यक्रम होतील. या उत्सवाला हिंदू बंधु-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे संघाकडून आवाहन करण्यात आले आहे.




