दिल्लीतील आश्रमात मुलींचा लैंगिक छळ, १७ विद्यार्थिनींची तक्रार; गुन्हा दाखल होताच स्वामी चैतन्यानंद फरार!

Delhi Ashram Swami Chaitanyananda Saraswati alias Partha Sarathy case : राजधानी दिल्लीत धर्माच्या नावाखाली काळे धंदे करणाऱ्या एका स्वयंघोषित बाबाचा पर्दाफाश झाला आहे. एका आश्रमात शिकणाऱ्या १७ विद्यार्थिनींनी आश्रमातील अवैध प्रकार उघडकीस आणले आहेत. वसंत कुंज परिसरातील एका प्रसिद्ध आश्रमाचा प्रमुख स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थसारथी नावाच्या बाबावर महिलांशी गैरवर्तन, छेडछाडीचे आरोप करण्यात आले आहेत. १७ विद्यार्थिनींनी या बाबावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार विद्यार्थिनींनी पार्थसारथीवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. या पीडित विद्यार्थिनी दिल्लीतील मॅनेजमेंट इन्स्टिट्युटमध्ये शिकत आहेत. या विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पार्थसारथीविरोधात तपास करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी सांगितलं “एकूण ३२ विद्यार्थिनींनी तक्रार दाखल केली असून त्यापैकी १७ मुलींनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या मुलींनी लेखी स्वरुपात तक्रार दाखल केली आहे. चैत्यनानंद त्यांना अश्लील मेसेजेस पाठवत होता, त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलत होता, चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता, असं या मुलींनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे. त्यानुसार पार्थसारथीविरोधात आम्ही गुन्हा दाखल केला आहे.”

पोलिसांनी सांगितलं की “विद्यार्थिनींनी तक्रार केली आहे की आश्रमातील महिला शिक्षिका, कर्मचारी व वॉर्डन बाबाच्या आदेशांचं पालन करण्यास सांगत होते. अनेकदा बाबा सांगेल तसं करावं यासाठी दबाव टाकला जात होता. या सर्वांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button