
चिपळूण शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न नगर पालिका, पशुसंवर्धन विभागाने मार्गी लावावा, माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांची मागणी
चिपळूण शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर होत असून नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावर नगर पालिका व पशुवैद्यकीय, पशुसंवर्धन विभागाने संयुक्तपणे ठोस पावले उचलून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांनी केली आहे.
शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यांनी नागरिकांवर हल्ले करण्याच्या घटना घडल्या आहेत. प्रशासनाने योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर त्याची जबाबदारी प्रशासनावरच राहील, असा इशारा शिंदे यांनी दिला. दरवर्षी कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी लाखो रुपये खर्च होतात; तरीदेखील कुत्र्यांची
संख्या वाढतच चालली आहे. बाहेरून कुत्रे आणले जात नसतानाही संख्या वाढत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काही दिवसापूर्वी नगर पालिके ने आयोजित केलेल्या बैठकीत पशुवैद्यकीय व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित राहिले. मात्र, या प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याने नागरिक व प्राणीप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. नागरिकांवर हल्ले झाल्यास जबाबदारी प्रशासनाचीच राहील. त्यामुळे दोन्ही विभागांनी गंभीरतेने विचार करून ठोस उपाय करावेत, अशी मागणीही श्री. शिंदे यांनी केली आहे.www.konkantoday.com




