सर्वपित्रीच्या विधिमुळे यंदाही बाणगंगा तलावात मृत माशांचा खच; पर्यावरणप्रेमी करणार फौजदारी खटला!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने ऐतिहासिक बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प हाती घेतला असून बाणगंगा तलाव पुन्हा एकदा दूषित झाला आहे. पितृपक्ष आणि सर्वपित्री अमावस्येनिमित्त करण्यात येणाऱ्या विधिंनंतर तलावात मृत माशांचा खच पडला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक विधिसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे बाणगंगा तलावात विसर्जन करण्यात येत असल्याने तलावातील माशांचा मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. यंदाही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या (एम. सी. मेहता गंगा प्रदूषण प्रकरण) आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या २०१८ मधील आदेशानंतरही प्रशासनाने तलावाकाठी धार्मिक विधि करण्य़ावर बंदी घातलेली नाही.

दरवर्षी बाणगंगा तलावाकाठी धार्मिक विधि करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. गेल्या काही वर्षांत या तलावाची लोकप्रियता वाढल्याने दिवसेंदिवस धार्मिक विधि करायला येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बाणगंगा तलावातील प्रदूषण रोखण्यात मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि जिल्हा प्रशासन अपयशी ठरल्यास न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध तक्रार करू, असा इशारा पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या येऊर एन्व्हार्यमेंटल सोसायटीचे प्रमुख रोहित जोशी यांनी दिला होता. त्यानुसार याप्रकरणी फौजदारी खटला करण्यात येणार असल्याचे रोहित जोशी यांनी सांगितले.

माशांचा मृत्यू

बाणगंगा तलावात गेली अनेक वर्ष मृत माशांचा खच आढळून येतो आहे. साधारण सर्वपित्री अमावस्येनंतर ही घटना घडत असल्याचे सांगतिले जाते. त्यामुळे यापूर्वीही स्थानिक तसेच पर्यावरणप्रेमींनी याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही त्यात कोणतेही बदल झालेले नाहीत. परिस्थिती जैसे थे असल्याचा आरोप सर्व स्तरांतून केला जात आहे.

बाऊन्सर्सच्या बंदोबस्तातही धार्मिक विधि

यंदा बाणगंगा तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी बाणगंगा मंदिराच्या ट्रस्टने बाऊन्सर्सची नेमणूक केली होती. तरीही तेथे धार्मिक विधि केल्याचे निदर्शनास आले. त्यापूर्वी गणपती विसर्जन रोखण्याचा प्रयत्नही मंदिर ट्रस्टने केला होता.

पालिकेची वायूविजन व्यवस्था नाममात्र

दरवर्षी या काळात तलावातील मासे मरतात. त्यासाठी गतवर्षी पालिका प्रशासनाने तलावासाठी वायूविजन व्यवस्था केली होती. तसेच पूजा विधीचे साहित्य गोळा करणारे एक यंत्रही तलावात सोडले होते. मात्र पालिका प्रशासनाचे हे सगळेच प्रयत्न निकामी ठरले आहेत.

पुनरुज्जीवन प्रकल्प

महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिकेने बाणगंगा तलाव व परिसराचा पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला असून या कामासाठी १० ते १२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button