
प्रदूषण रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात धावू लागल्या सीएनजी बसेस
वाढत्या डिझेल किंमतीमुळे आणि इंधन खर्च बचत तसेच पर्यावरण संरक्षणासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) रत्नागिरीत सीएनजी बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणातील चिपळूण आगारामध्ये ३० जुन्या एसटी बसेस सीएनजीमध्ये परिवर्तीत करून रस्तयावर धावायला सुरूवात केली आहे.
या बसेस माईल्ड स्टीलच्या बांधकामावर टाटा चेसीसवर तयार केल्या असून प्रवाशांसाठी ४४ आसनाची सोय, पॅनिक बटण, सोयीस्कर हँडलसह आरामदायी सुविधा देण्यात आली आहे. या प्रायोगिक ताफ्यातील बसेस चिपळूण-रत्नागिरीसह जिल्ह्यातील विविध मार्गावर धावणार आहेत.
लवकरच आणखी ५० सीएनजी बसेस रत्नागिरी आगारात येणार असून त्यानंतर इतर आगारांमध्येही या बसेस सुरू होतील. इंधन बचत सुनिश्चित करण्यासाठी रत्नागिरी विभागात तीन सीएनजी पंप उभारले जात आहेत. सध्या चिपळूण आणि रत्नागिरी येथे पंप सुरू आहेत. तर खेड येथे उभारणी सुरू आहे. एकदा गॅस भरल्यावर ३०० कि.मी. पर्यंत बसेस धावू शकतील. एसटी महामंडळाच्या या उपक्रमामुळे इंधनाची बचत, पर्यावरण संवर्धन आणि प्रवाशांसाठी आरामदायी सुविधा मिळणार आहेत.www.konkantoday.com



