
ढोलेवाडी येथे (संगमेश्वर) बिबट्या आढळला मृतावस्थेत

संगमेश्वर : तालुक्यातील असुर्डे ते चाळके वाडी या मुख्य रस्त्यावर ढोलेवाडीलगत बिबट्या (बछडा) मृत अवस्थेत आढळला. अज्ञात वाहनाच्या धडकेने बछडा मृत झाला असल्याचे वन विभागाने पाहणीनंतर स्पष्ट केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज (२३ सप्टेंबर) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास असुर्डेचे पोलीस पाटील सुभाष गुरव यांनी असुर्डे ते चाळके वाडी या मुख्य रस्त्यावर ढोलेवाडीलगत बिबट्या (बछडा) मृत अवस्थेत असल्याची माहिती दूरध्वनीवरून दिली. त्याप्रमाणे परिक्षेत्र वन अधिकारी (रत्नागिरी) यांना माहिती देऊन सर्व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. असुर्डे ते चाळके वाडी रस्त्याच्या उजव्या बाजूला बिबट्याचा बछडा निपचित पडलेला दिसून आला. जवळ जावून बछड्याची पाहणी केली असता अज्ञात वाहनाच्या धडकेने बछडा मृत झाला असल्याची खात्री पटली. त्यानंतर कडवईचे पशुधन विकास अधिकारी श्री. बेलूरे यांच्याकडून बिबट्याचे शवविच्छेदन करून घेतले. हा बछडा हा नर जातीचा असून अंदाजे ५ ते ६ महिन्याचा आहे. या घटनेचा गुन्हा नोंद केला असून कागदपत्र तयार करून पुढील तपास चालू आहे.
ही कार्यवाही रत्नागिरी चिपळूणच्या विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कार्यवाहीसाठी परिक्षेत्र वन अधिकारी (रत्नागिरी) प्रकाश सुतार, वनपाल संगमेश्वर (देवरुख) सागर गोसावी, वनरक्षक आकाश कडूकर, सहयोग कराडे, सूरज तेली, श्रीमती सुप्रिया काळे, संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील सुभाष गुरव वन्यप्राणी मित्र दिनेश गुरव यांनी कार्यवाही पूर्ण केली.
अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणी सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी रत्नागिरी गिरीजा देसाई यांनी केले आहे.




