
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम
रत्नागिरी, दि. 22 ):- जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयामार्फत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी सादर केलेल्या अर्जामध्ये त्रुटी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वत: किंवा त्यांचे कुटुंबिय यांनी समिती कार्यालयामध्ये त्रुटीपूर्ततेसाठी उपस्थित राहून त्रुटीपूर्तता करावी, असे आवाहन उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी केले आहे.
सध्या ज्या विद्यार्थ्यांनी नीट, सीईटी, क्लॅट व जेईई इत्यादी परीक्षा दिलेल्या आहेत. त्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी समिती कार्यालयामध्ये अर्ज दाखल केलेला आहे, मात्र प्रस्तावामध्ये त्रुटी असल्याने अद्याप जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही अशा विद्यार्थ्यांनी २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत समिती कार्यालयाशी व्यक्तीशः अथवा पालकांमार्फत संपर्क साधून प्राधान्याने त्रुटींची पूर्तता करुन घ्यावी जेणेकरून समितीस विहीत वेळेत सदर प्रकरणांवर गुणवत्तेनुसार निर्णय घेता येईल.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील सर्व प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज त्यांच्या संबंधित महाविद्यालयामार्फत विहीत मार्गाने नियम व अधिनियमानुसार स्विकारले जातील. पदविकेच्या तृतीय वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांचे जात पडताळणीसाठीचे ऑनलाईन अर्जही स्विकारले जाणार आहेत. कोणत्याही अर्जदाराने त्रयस्थ व्यक्तींकडे संपर्क करू नये. त्रयस्थ व्यक्तीच्या आमिषास बळी पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.



