
रत्नागिरी जिल्ह्यात जलजीवन’ची कामे बंद;ठेकेदारांची तब्बल ८० कोटी रुपयांची बिले थकित
रत्नागिरी जिल्ह्यात जलजीवन या योजनेंतर्गत कामेही सुरू झाली.मात्र, या याेजनेंतर्गत ठेकेदारांची तब्बल ८० कोटी रुपयांची थकीत बिले देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या ठेकेदारांनी जलजीवनची कामे बंद केली आहेत. जिल्ह्यातील जलजीवनच्या सुमारे ७५० योजनांचे काम बंद करण्यात आले आहे.
जिल्ह्यात जलजीवनच्या १,४३२ योजना मंजूर आहेत. त्यापैकी १,४२८ योजनांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. प्रत्यक्षात १,४१३ योजनांची कामे सुरू करण्यात आली होती. तर जिल्ह्यातील ५६४ योजनांची कामे १०० टक्के पूर्ण झाली होती. तसेच ७५ ते १०० टक्क्यांदरम्यान काम सुरू असलेल्या ३०५ योजना असून, ५० ते ७५ टक्के काम झालेल्या ३०७ योजना आहेत. तर २५ ते ५० टक्के काम १७५ योजनांचे झालेले असून, शून्य ते २५ टक्के काम झालेल्या ५४ योजना आहेत. ही कामे टप्प्याटप्प्याने सुरू असली, तरी त्या ठेकेदारांना अद्याप त्यांची बिले दिलेली नाहीत.
जलजीवनच्या ठेकेदारांना बिले न मिळाल्याने ते अनेकदा जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, शासनाकडूनच निधी न आल्याने जिल्हा परिषद त्यांची बिले कुठून देणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे




